
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतीनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
( श्री शिवाजी विद्यालयास तीस हजारांची पुस्तके भेट )
श्री शिवाजी विद्यालय कंधार चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित नागनाथ राव पंचगल्ले यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेल्या वाढवणा जिल्हा परिषद शाळेस तीस हजाराची ग्रंथसंपदा भेट दिली एवढेच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात दिग्रस ( बु ) येथील श्री शिवाजी विद्यालयास सुद्धा तीस हजार रुपयाची ग्रंथसंपदा भेट देऊन एक आगळावेगळा उपक्रम राबविला कारण पंडितराव पंचगल्ले हे शिवाजी विद्यालयाचे गणित विषयाचे एक तज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत होते त्याच कारणास्तव शाळेसोबत आपली कायम नाळ जुळून राहावी व विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा या उद्देशाने ग्रंथसंपदा भेट दिली आहे . .शाळा आणि विद्यार्थी यांच्या नात्यांचे बंध हे नेहमीच भक्कम आणि अतूट प्रेमाचे असतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेचे भरीव योगदान असते. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांचेही काही देणे लागते या भावनेतून दिग्रस (बु.) येथील गणित विषयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक पंडित नागनाथ पंचगल्ले (वय ७५) यांनी आपली शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी जवळपास तीस हजार रुपये रकमेची मौल्यवान ग्रंथ भेट दिली. त्यांनी ही पुस्तके ता. १३ मे रोजी स्वतः शाळेत जाऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री बोटावर सर व शालेय समिती अध्यक्ष श्री विश्वंभर जयवंतराव पाटील सर यांच्याकडे सुपूर्द केली.
भेट स्वरूपात देण्यात आलेल्या या ग्रंथसंपदेत ‘जीवनाचे शिल्पकार व इतर चरित्रे’, ‘स्वप्न आणि सत्य आणि इतर’, ‘दिल्ली डायरी’ (लेखक : साने गुरुजी), ‘द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पिकिंग’ (लेखक : डेल कार्नेजी), ‘द पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग’, ‘द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ यांसारखी ज्ञानाची क्षितिजं विस्तृत करणारी ख्यातनाम लेखकांची प्रेरणादायी पुस्तके, कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह ललित लेखसंग्रह अशी वैविध्यपूर्ण व उपयुक्त पुस्तके श्री. पंचगल्ले यांनी भेट देऊन आपल्या शाळेसाठी एक आदर्श उपक्रम राबवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक ए.बी. गुट्टे सर यांनी केले. प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष श्री विश्वंभर जयवंतराव पाटील , सहशिक्षक मारोती सोनटक्के सर सेवानिवृत्त सहशिक्षक जायेभाये सर , भागवत मॅनेवार , सेवक बालाजी चुब्बेवार इत्यादी उपस्थित होते . यावेळी बोलताना म्हणाले की, इंटरनेट व मोबाईलच्या जमान्यात वाचकवर्ग तुरळक होत चालला असून सध्याच्या परिस्थितीत ग्रंथ हेच ज्ञानाचे मोठे भांडार आहे. पुस्तकेच माणसाला अंतर्दृष्टी प्रदान करतात. पुस्तकांचे जीवनातील महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पैसे संपतात पण पुस्तकातून मिळणारे ज्ञान हीच खरी संपत्ती असून ती कधीही संपत नाही. पुस्तके अमूल्य संसाधन असल्याचे स्पष्ट केले. पुस्तकरुपाने शाळेस अमूल्य भेट दिल्याबद्दल पंडित पंचगल्ले व परिवारातील सदस्यांचा शाळा प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
दरम्यान श्री. पंचगल्ले यांना शिक्षक सेवेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व मित्रांचे पुनर्मिलन झाले.
पंडितराव पंचगल्ले यांनी दिलेल्या पुस्तकांमुळे शाळेचे ग्रंथालय समृद्ध होऊन विद्यार्थ्यांच्या करिअर बांधणीसाठी मदत होणार असल्याची भावना सेवानिवृत्त शिक्षक जायेभाये सर यानी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच दिग्रस (बु.) येथील मनोहर कुलकर्णी वाचनालयाचे ग्रंथपाल गोविंद शिंदे, देविदास शिंदे, प्रा. शरद पंचगल्ले,उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ए.बि.गुट्टे सर , श्री मारोतराव सोनटक्के सर , ग्रंथपाल उत्तम गलांडे सर , भागवत श्रीरंग म्यानेवार , सेवक बालाजी चुब्बेवार यांनी परिश्रम घेतले.