
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे श्रेष्ठी के.चंद्रशेखर राव यांनी २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तेलंगणा राज्याच्या सिमेवरील विदर्भातील काही जिल्ह्यांना लक्ष केले असून याठिकाणीच्या भाजपा काॅंग्रेस वगळता अन्य पक्षातील जनाधार असणा-या नेत्यांशी संपर्क करुन भारत राष्ट्र समितीत सामील करुन घेत असल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदारांच्या प्रवेशाने इतर पक्षांतील उमेदवारीसाठी इच्छुक व बाशिंग बांधून बोहल्यावर बसलेल्यांसाठी आयती संधीच चालुन आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला येत आहे. दिल्ली, मुंबईत भाजपाचे सरकार असल्यामुळे व कर्णाटक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवित सत्ता काबीज केल्यानंतर नवसंजीवनी मिळालेल्या काॅंग्रेस या दोन्ही पक्षांतील कोणत्याही मोठ्या नेत्यांना के.चंद्रशेखर राव आतापर्यंत आपल्या गळाला अडकवू शकलेले नाही हेही तेवढेच सुर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. २०२४ वर्ष हे निवडणूक वर्ष म्हणून पाहिल्या जात असुन कदाचीत आतापासूनच आयाराम गयाराम प्रथेला सुरूवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील प्रवेशानंतर भारत राष्ट्र समिती विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी के.सी.आर आपली संपुर्ण ताकद झोकुन देणार असल्याचे चित्र त्यांच्या एकंदर झंझावाती दौ-यावरुन वाटत आहे.