
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड – अनेक कार्यक्रमांचा संगम म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. प्रा.विठ्ठल बरसमवाड हा गोकुळवाडीचा हिरा आहे.मी त्यांना मातीत राबताना व लेखन करताना पाहिले आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वरी व तुकारामांचा गाथा देऊन त्यांनी आपल्या मातेचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथ तुला केली हा क्षण प्रत्येकाने आपल्या हृदयात साठवुन ठेवावा असा आहे.जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून ही ग्रंथ तुला केली आहे. आईचा जीव हा नेहमी वांगल्याकडे असतो. साहित्य शहरातच जन्माला येते असे नाही तर ते ग्रामीण भागात ही जन्माला येते. तुम्ही ७५ ग्रंथ भेट दिले आहात तसे ७५ झाडे ही लावा. लहानपणी लेकरं म्हणतात आई माझी, आई माझी पण मोठे झाले की म्हणतात आई तुझी आई तुझी. लेकराला ताट द्या पण पाठ देऊ नका असे यामुळेच म्हटले जाते. सामाजिक चित्र आज बदलले आहे. तुमच्या गावाच्या शेतीच्या सातबारावर तुमचे नाव असेल पण गावाच्या गुणवंतांच्या सातबारावर विठ्ठल बरसमवाड यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असेल. जोपर्यंत तुम्ही दूध विकायचे सोडून शिक्षणाकडे येणार नाहीत तोपर्यंत गोकुळवाडीच्या नागरिकांचा विकास होणार नाही. साहित्य हे वेदनेतून जन्माला येते असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे सर्पदंश चिकीत्सक डॉ .दिलीप पुंडे यांनी गोकुळवाडी (खैरकावाडी )ता.मुखेड येथे आयोजित केलेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी दुसरे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ .रामकृष्ण बदने यांनी जागतिक मातृगौरव दिनाचे औचित्य साधून श्रीमती लक्ष्मीबाई गणपतराव बरसमवाड यांच्या अमृत महोत्सव व ग्रंथतुलेच्या निमित्ताने आई या विषयावरती विस्ताराने मार्गदर्शन केले. ते म्हणाले जगातल्या प्रत्येक व्यक्तीला घडविण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो.अलीकडच्या काळात आपण आई-वडिलांची उपेक्षा करायला लागलो आहोत. परंतु प्रा.विठ्ठल बरसमवाड सरांसारखे काही सुपुत्र आजही या जगामध्ये आहेत जे आपल्या आईच्या ग्रंथतुलेच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा,भगवत गिते सारखे ग्रंथतुला करतात व इतरांना ते ग्रंथ सढळ हाताने वाटप करतात. त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना या संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामी त्यांच्या सौभाग्यवती सौ. कल्याणी बरसमवाड,प्राचार्य डॉ.धोंडीराम वाडकर व त्यांच्या सौभाग्यवती तसेच त्यांचे बंधु मोगलाजी बरसमवाड यांचे देखील मोलाचे योगदान राहिले आहे. आपण या कार्याचा वसा आणि वारसा आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या आयुष्यामध्ये असे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला आज त्यांनी मातृगौरव पुरस्कार देऊन काम करण्याचे बळ दिले आहे त्याचबरोबर माझ्यासोबत अनेकांना पुरस्कार देऊन समाजातील चांगुलपणाला प्रोत्साहन देण्याचे काम केले त्याबद्दल त्यांनी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.त्यांच्या आई या विषयावरील व्याख्यानावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
डॉ.दीनानाथ ऐतलवाड म्हणाले की एका वाहनात सर्वचजण जाऊ नका.अपघात होणार नाही याची काळजी घ्या.आजचा हा खूप चांगला कार्यक्रम बरसमवाड यांनी घेतला आहे .प्राचार्य वाडकर सरांचे संस्कार व त्यांच्या आईचे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. असे कार्यक्रम आपण सर्वांनी घेतले पाहिजेत.
गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे साहेब यावेळी बोलताना म्हणाले की शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे.शिक्षण का घ्यायचे या प्रश्नाचे उत्तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आज मिळाले.आज सर्वत्र मूल्य शिक्षणाची गरज आहे. आई-वडिलांची सेवा करा. शेवटी त्यांनी आई वरील एक कविताही सादर केली. मंदिरासारखीच मदत शाळेलाही करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना व गावकऱ्यांना केले.
संजय आऊलवार म्हणाले की सुंदर कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल विठू माऊली प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक कौतुक.या कार्यक्रमामुळे समाजाची सुधारणा होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा जो मूलमंत्र दिला तो आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविला पाहिजे.बरसमवाड यांनी लिहिलेल्या दोन्हीही ग्रंथांचे आज प्रकाशन झाले आहे हे दोन्ही ग्रंथ वाचून आपल्या संग्रही ठेवण्यासारखे आहेत.
प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की गोकुळवाडीतील हे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन आहे. येथे भाषे विषयी व मातेविषयी खूप सकारात्मक चर्चा दिवसभरात झाली हे पाहून आनंद वाटला. असी संमेलने गाव पातळीवर होणे महत्त्वाचे आहे. मी संयोजकांनी सुंदर कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा विठू माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल गणपत बरसमवाड यांनी केले तर स्वागत अध्यक्षीय भाषण प्रा.डाॅ.पुरूषोत्तम जून्ने यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथील प्रा.डाॅ. यादव सूर्यवंशी यांनी केले तर आभार विठू माऊली प्रतिष्ठानच्या सचिव कल्याणी विठ्ठलराव बरसमवाड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
यावेळी खालील मान्यवरांना डॉ. दिलीप पुंडे साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.ज्यात प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांना (वै.राष्ट्रसंत वटेमोड महाराज जीवन गौरव पुरस्कार) प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने (मातृ गौरव पुरस्कार) श्री शिवाजी कोनापुरे (आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार ) नारायण मानेजीराव सकिनवार (गुरुगौरव पुरस्कार) श्री विठ्ठल राविकर गुरुजी (गुरु गौरव पुरस्कार)दिनानाथ ऐतलवाड (आरोग्य रत्न पुरस्कार )प्रा.शुभांगी दत्तात्रय पारेकर (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार )प्रा.डाॅ. पुरुषोत्तम जुन्ने (स्वामी विवेकानंद ज्ञान रत्न पुरस्कार) प्रा. अविनाश तुकाराम तलवारे (क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार )श्री ह. भ. प.पांडुरंग शास्त्री होकर्णेकर (कै. गणपतराव विठोबा वाडीकर यांच्या स्मरणार्थ वाडीकर कृषी भूषण पुरस्कार )सौ.सरुबाई शिवाजी मोरे ( कै.गंगाबाई मोगलाजी बरसमवाड यांच्या स्मरणार्थ गंगामाता पुरस्कार) आदि पुरस्कारांचे शाल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ज्ञानेश्वरी ग्रंथ, महापुरुष व संतांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
तदनंतर मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई गणपतराव बरसमवाड यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा, भगवद्गीता या ग्रंथांनी ग्रंथ तुला करण्यात आली तसेच प्रा. विठ्ठल बरसमवाड यांनी लिहिलेल्या ‘मराठी ज्ञानपीठाचे मानकरी’व सारथी सूविचार संग्रह १००८’या दोन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील भजनी मंडळ, पोतराज, वासुदेव, गोंधळी यांच्यासह ग्रामस्थ व साहित्यिकांच्या उपस्थितीत मिरवणुकीने ग्रंथ दिंडी गावातून काढण्यात आली. तदनंतर वै. धर्मभूषण वटेमोड महाराज व कै. गणपतराव बरसमवाड यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास दैनिक लोकराज्यचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड, चालू वार्ता दैनिकाचे पत्रकार सुरेश जमदाडे, शिवकुमार बिरादार, शिवाजी पाटील बेळीकर, प्रा.वडजे सर व ग्रामस्थ तथा पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तदनंतर सर्व उपस्थितांना सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.