
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:दि. १५ : मरखेल गावातील एका उच्च जातीच्या कुटुंबातील काही सदस्यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एका दलित तरुणाच्या घरात घुसून मारहाण करीत जातीवाचक शिवगाळ केल्याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरखेल येथे अमोल मारोती जाधव (वय २३ वर्ष) हा त्याची आई. दोन भाऊ व बहिणीसह राहतो. दि. १४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अमोल, त्याची आई सुशिलाबाई व बहीण प्रतिभा असे तिघेजण घरात असताना अचानक गावातील बालाजी रावसाहेब, आकाश रावसाहेब, विकास रावसाहेब, दिनेश कोटले, अविनाश कोटले, अभय दंडेवार, अमोल शिपुरे, माधव अपसंगे, अभिजीत चेपुरे, मधुकर दंडेवार, अक्षय चेपुरे हे सर्व रा. मरखेल फिर्यादीच्या घरात घुसले. जुन्या भांडणाचे खुसपट काढून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी बालाजी रावसाहेब याने त्याच्या हातातील लाकडाने अमोलच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली मारले. आकाश रावसाहेब याने त्याच्या हातातील लाकडाने पाठीत मारले. विकास रावसाहेब याने त्याच्या हातातील लाकडाने डाव्या हातावर मारून दुखापत केली. गावातील नागरिक घरात घुसून अमोलला मारहाण करीत असताना आई सुशीलाबाई व बहीण प्रतिभा यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील आरोपींनी या दोघी महिलांना थापडा बुक्याने व काठीने मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करून अमोलला धमकी दिली. त्यावेळी गावातील समीर शेठ मरखेलकर, प्रदीप रॅपनवाड, विठ्ठल भोसले, प्रतापराव पवार, महेश कोकणे यांनी सोडवा सोडवी केली. याप्रकरणी अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२३, ३२४, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे करीत आहेत.