
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -समाधान कळम
वडोद तांगडा
भोकरदन तालुक्यात आणि तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांने दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या कापसात डस्ट माईटचा (पिसवा) प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कुटुंबीयांना त्वचारोगांचा सामना करावा लागत आहे. अंगाला खाज सुटण्याचे प्रमाणही व वाढीस लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
सिलिंडरचे भाव वाढले मात्र कापसाचे भाव केव्हा वाढणार, असा प्रश्न आज गावखेड्यात विचारला जात आहे. कापसाचे दर 6500 रुपयांवर स्थिरावले आहेत. गेल्या हंगामाप्रमाणे कापसाचे दरात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
गेल्या हंगामात ११ हजार रुपयांपर्यंतचा दर कापूस उत्पादकांना मिळाला. यंदा मात्र उत्पादन खर्चाची भरपाई होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवाढीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे.
परंतु जून महिन्यांपासून पेरणीसाठी लक्ष लागले असतानाच दरात सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी शेतकरी दुहेरी विवंचनेत सापडला आहे. अशातच घरात साठवलेल्या कापसात पिसवांचे प्रमाण वाढीस लागले आहे.
या पिसव्या चावा घेत असल्याने अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे अशा समस्यांना शेतकरी कुटुंबीय सामोरे जात आहेत.
भाववाढीच्या अपेक्षेने कापसाची साठवणूक केली. परंतु दर तर तेजीत आले नाहीत मात्र साठवणूक केलेल्या कापसात पिसव्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातूनच अनेक प्रकारच्या त्वचाविकारांना सामोरे जावे लागत आहे.
जेथे धूळ किंवा तत्समस्थिती असते, अशा भागात पिसव्या कापूस किंवा अन्य सामानात लपून राहतात. हे अत्यंत सूक्ष्म असल्याने डोळ्याने दिसत नाहीत. त्यांच्यामुळेच त्वचेवर असे परिणाम दिसत आहेत. ही शेतातील नसून घरातील किड आहे.