
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.आपल्या देशात जातीयतेचा इतिहास शेकडो वर्षापासून आहे. त्याचे चटके येथील तळागाळातील शोषित, वंचितांना कायमच भोगावे लागले आहेत. भोगावे लागत आहेत. पुर्वी भयंकर अशा शोषनाला या वर्गाला तोंड द्यावे लागले होते. त्यामध्ये जगण्याच्या अधिकारापासून ते मानवतेच्या अनेक अधिकारांना मुकावे लागले होते.या जात उतरंडीच्या टप्प्यात प्रत्येक जात आपल्यापेक्षा खालच्या उतरंडीवर असलेल्या जातीला कनिष्ठ अथवा नीच मानत तर आपण उच्चभ्रू आहोत असे समजत.उदाहरण जर द्यायचे असेल तर सर्वात खालच्या स्तरावर किंवा अस्पृश्य म्हणून येथे दलित म्हणजेच महार धर्मांतरानंतर बौद्ध झालेले ,मांग ,चांभार ,ढोर त्यानंतर त्याच्या वर कुंभार ,माळी ,साळी ,वडार,धनगर,तेली असे बारा बलुतेदार त्याच्या वर कुणबी ,मराठा ,वाणी ,लिंगायत ,अशा अनेक जाती या टप्प्यावर तर सर्वात वर कोमठी ,ब्राह्मण अशी व्यवस्था किमान महाराष्ट्रात तरी अस्तित्वात आहे. मग या टप्प्यातील प्रत्येक जण आपल्या खालच्या पेक्षा आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवत.ब्राह्मण सोडले तर तसे सर्वच अस्पृश्य पण इतरांना त्याचे काही वाटत नाही. अनेक हक्क, अधिकार यापासून वंचित राहूनही या टप्प्यात सगळे बरोबर आहे म्हणून गपचूप नांदत आले आहेत. याला अपवाद फक्त बौद्ध समाज. त्याने आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली व त्यापासून वेगळे झाले. याचे श्रेय डॉ आंबेडकरांना जाते.बौद्ध समाज स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त क्रांती केलेला समाज म्हणून पुढे आला आहे. ज्यांला शिक्षणाचा अधिकार नव्हता ते आज मोठमोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत. उद्योगधंदे सुरू आहेत. बऱ्यापैकी संपत्ती साठा केला आहे. घटनेने दिलेले अधिकार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण यांच्या बळावर या समाजाने गरूढझेप घेतली आहे.
स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो.लोकशाही मध्ये सर्व अधिकार जनतेकडे असतात. आपल्या राज्यघटनेने सर्व नागरिकांना तसे अधिकार दिले आहेत. असे असताना आजही समाजातील जातीप्रथा बंद झाल्याचे दिसून येत नाही. जातीयतेचे स्वरूप बदलले आहे. पुर्वी अस्पृश्य म्हणून अन्याय केला जात.आज एकत्र बसणं ,उठणं,खाणंपिणं होत आहे. तरीही जातीयतेचा नजरेतून हिणवणे मात्र कमी झाले नाही. सर्वात जास्त त्रास बौद्ध समाजाला होतो.इतरांना ही होत असेल पण ते बोलत नाहीत म्हणून त्यांच्या वर झालेला अत्याचार उठून दिसत नाही.नोकरीच्या ठिकाणी तर ते एस.सी.चे म्हणून एक हिणकस नजरेने पाहिले जाणे हे माझ्या बाबतीत घडले नाही पण इतर बांधवांचा अनुभव ऐकलं की अंगावर शहारे येतात. व्यवसायाच्या ठिकाणी जातीमुळे आर्थिक नुकसान होत असते.ग्रामीण एखादा हॉटेलचा व्यवसाय टाकला तर ग्राहक येण्याची शक्यता खुपच कमी असते.ग्रामीण भागात एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तरी तिथे जात आडवी येते.एवढेच काय नांदेड सारख्या शहरात राहण्यासाठी खोली भाड्याने किंवा विकत घ्यायची म्हटलं तरी जात विचारली जाते हा माझा स्वानुभव आहे. आजही काही जण एससी समाजातील मित्राच्या घरी जाऊन जेवतील ,बसतील ,खातील पण स्वतःच्या घरात न्यायचे मात्र धाडस करत नाहीत. याला काही अपवाद असतात.
एवढे सांगायचे कारण म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यावरून सर्रासपणे वाद होत आहेत. त्या वादाचे रूपांतर एखाद्याचा खुण होईपर्यंत होत आहेत. महाराष्ट्रात गत काही वर्षापासून अनेक जातीयतेच्या हिंसक घटना घडल्या आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यावरून गावात कर्फ्यू ,दंगे होण्याच्या घटणांचे प्रमाण वाढतच आहे. अशीच एक घटना नांदेड येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंढार या गावात घडली आहे. या गावात आजतागायत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत नव्हती. त्यामुळे गावातील अक्षय भालेराव या तरूणाने धाडस करून पुढाकार घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.त्याच गोष्टींची चिड धरून काही समाजकंटकांनी अक्षय भालेराव या तरूणावर चाकूने हल्ला केला. निर्दयीपणे अक्षयचा भर रस्त्यात खुण केला.या घटनेची करावी तितकी निंदा कमी आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही अजून स्विकारले नाही तो तुमचा व्यक्तीगत निर्णय आहे पण एखाद्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणे हे तुम्हाला कोणी अधिकार दिले आहेत. हे सर्व विकृत मानसिकतेतून घडत आहे. जात अजूनही इथून गेली नाही. नासूर होऊन इथल्या समाजव्यवस्थेला नासवत आहे. . जातीयतेचा कळस महापुरुषांच्याही वाट्यास आलेला दिसून येतो नांदेड शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात राजकीय लाभ घेणारे उच्चभ्रू लोक व तरुण पिढी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा करतात तसेच गणेश उत्सव थाटामाटात साजरा करतात आणि नवरात्रीच्या दुर्गा मातेची मिरवणूक गावातून थाटामाटा मिरवत निघतात तेव्हा तेच लोक ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना एक विशिष्ट स्व अधिकार दिला , अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले , राजकीय हक्क प्रदान केले , मतदानाचा हक्क देऊन त्या मतदाराला एक राजा माणूस बनवले अशा या महापुरुषांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार घालवण्यासाठी सडक्या व नासक्या विचारसरणीच्या सनातनी , राजकीय लाभार्थ्यां पासून ते तरुण पिढी आजही धजावत नाही जवळपास नऊ ते दहा वर्षे झाले हे उच्चवर्णीय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार घालण्यासाठी सुद्धा येत नाही अशा या नासक्या विचारसरणीच्या लोकांचा धिक्कार होणे तेवढेच अपेक्षित आहे अशा विचारसरणीच्या लोकांमुळे समाज व्यवस्था नासूर होऊन नासत चाललेली दिसून येत आहे