
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
रस्त्या अभावी शेकडो एकर शेतकऱ्यांची पेरणी आली संकटात
अर्धापूर : तालुक्यातील बामणी ते निजामपूर वाडी रस्त्या व पुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून संत गतीने सुरू असून अर्धवट कामामुळे येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता सुरू करून द्यावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.
बामणी ते निजामपूर वाडी रस्त्याचे व नदीच्या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. तर रस्त्यावर मध्यभागी ग.नं.१९९ मधील व्यंकटी कदम यांच्या शेताजवळील रस्ता, पुलाचे बांधकाम १ वर्षापासून अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुत्तेदार व अधिकारी यांना सदर प्रकरणी सरपंच व शेतकरी यांनी अनेक वेळा विनंती केली पण याकडे कानाडोळा केला जात आहे.
नदी पलीकडे गावातील ६० ते ७० टक्के शेत जमीन असल्याने शेतातील बियाणे धान्य आदी दळणवळणाची कामे मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर होतात. पण पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्याने व सदर रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने शेतकऱ्यांना पायी जाणेही अवघड झाले आहे. संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन सदर थांबलेले काम तात्काळ करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बामणी निजामपूर वाडी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे गावातील ७० टक्के शेतकऱ्यांची पेरणी रखडली जाऊ शकते. संबंधितांनी रस्त्याचे काम तात्काळ करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.