
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना समोर आली आहे.
जालना:कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. सामान्य नागरिकांची एखादी मौल्यवान वस्तू चोरीला गेली तर ते मदतीसाठी पोलिसांकडेच जातात. मात्र चोरांनी जर पोलिसांच्या वस्तूवर डल्ला मारला तर त्यांनी कुठे जायचं असा प्रश्न निर्माण होतोय. कारण जालन्यामध्ये एका चोराने चक्का पोलिसाची दुचाकीच गायब केली…
जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना समोर आली आहे. कादराबाद पोलिस चौकीजवळ कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबवली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिस कर्मचारी सकरुद्दीन तडवी यांनी आपली दुचाकी चौकीसमोर असलेल्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्या ठिकाणाहून एका चोरट्याने हातोहात ही दुचाकी पसार केली.
भरदिवसा पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरी गेल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाल्याने या चोरट्याला पकडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.