
(पेरणी योग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना ओठीतील मुठी चाड्यावर रित्या करण्यासाठी अजूनही प्रतिक्षाच)
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- औसा तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे गेले आर्द्रा नक्षत्राचे सात दिवस संपले पण अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी करण्यासाठी सज्ज असलेल्या बळीराजाला ओठीतील मुठी चाड्यावर रित्या करण्यासाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे. निसर्गाच्या या खेळीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. मागील वर्षी सुरुवाती पासून पाऊस झाला तो शेवट पर्यंत हि होताच त्यामुळे खरिपातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक फटका सोयाबीन या पिकाला बसला त्यामुळे यावर्षी तरी चांगले होईल हि शेतकऱ्यांना अपेक्षा होती.पण ती हि फोल ठरते की काय अशा चिंतेत शेतकरी पाह्यला मिळतोय. औसा तालुका हा तसा खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जायचा. आजही ऊस हे बारमाही पिके सोडले तर अन्य बारमाही पिके हि बोटावर मोजण्या इतकीच आहेत. मागील काही वर्षांपासून औसा तालुक्यात सोयाबीन चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी आपला बैल बारदाना मोडीत काढला असल्यामुळे ट्रॅक्टरवरच पेरणी केली जात आहे. ट्रॅक्टरवर पेरणी असल्यामुळे बहुतांश शेतकरी एकच पिकांची पेरणी करतात. आता तर मृग नक्षत्र कोरडे गेले आर्द्रा नक्षत्राची सुरुवात होऊन सात दिवस उलटले पण अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही पेरण्या लांबत असल्यामुळे उधार उसनवारी करून घरांमध्ये आणून ठेवलेले खते बियाणे यांच्या ओट्या चाड्यावर धरुन काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज असलेल्या बळीराजाला ओठीतील मुठी चाड्यावर रित्या करण्यासाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे. कधी एकदा मृग नक्षत्राची सुरुवात होते आणि कधी पेरणी करता येईल यासाठी शेतकरी अतुरलेला असतो. पण निसर्गाच्या या दुष्टचक्राचा सामना शेतकऱ्यांना कधी बिगर पावसाचा कधी जास्तीच्या पावसाचा करावा लागतो यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका हा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल होतो आहे. औसा तालुक्यात मागील पाच दिवसांपासून दररोजच पाऊस पडतो आहे पण तो रिमझिमच. आशा या रिमझिम पावसामुळे पेरण्या हि करता येत नाहीत. पिके हातात आल्यानंतर पडलेले भाव कधी उशीरा होणाऱ्या पेरण्या तर कधी हातातोंडाशी आलेली पिके हातातून जाणे आणि सर्वात गहण प्रश्न म्हणजे शेतात काम करणाऱ्या रोजंदारीचा या सर्वा मुळे शेतीची अवस्था म्हणजे धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशीच झाली आहे.