
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी उमरगा/ तुळजापूर
तुळजापूर:– आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गणेशनगर तांडा परिसरातील अंगणवाडी क्रमांक 07 येथील बालकांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत शाळा व परिसरात दिंडी काढून वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने जतन करावा या हेतूने अंगणवाडी सेविका सत्यशीला पाटील ( कदम ) यांच्या कल्पनेतून बालगोपाळांचा दिंडी सोहळा आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिंडीतील सहभागी बालकांनी ‘राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, असा नामघोष करत असताना उपस्थित पालक, नागरिक भाराऊन गेले होते. बालकांच्या या सोहळयाने आनंदी होऊन उपस्थित नागरिक शंकर राठोड, शारदाबाई पवार यांनी बालकांना रोख रकमेचे बक्षीस दिले.दिंडीत सहभागी बालकांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदणी टिळा, खांद्यावर पताका, मुले नेहरूशर्ट, धोतर, तर मुलींनी नऊवारी साडीचा काष्टा घातलेला पेहराव करून फुगड्या खेळून दिंडीचा आनंद लुटला. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सत्यशीला पाटील कदम , मदतनीस उर्मीला सगर, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.