
आ.अमित झनकांचे पंढरपुरच्या वारीत पांडुरंगाला साकडे. झनक घराण्याची वारी परंपरा कायम.
वसंत खडसे
उपसंपादक वाशिम
वाशिम : संत वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व समतेचा संदेश देणारा संप्रदाय आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वारकरी संप्रदाय हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या संप्रदायाला खूप मोठी संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होतात. गेल्या चार पिढ्यापासून मांगुळ झनक येथील झनक घराण्याची वारीची परंपरा रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी कायम राखली आहे. ते दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या सुद्धा पैदल वारीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कीर्तन प्रवचन श्रवणा सोबतच हातात टाळ घेऊन भजन गायनाचा सुद्धा आनंद घेतला. परंतु वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असल्याचे काहूर त्यांच्या अंतर्मनाला बोचत होते. शेतकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे त्यांनी यावर्षी भरपूर पाऊस पडू दे..! शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ दे..! अशी प्रार्थना केली.
झनक घराण्याची परंपरागत संस्कृती जोपासणारे आमदार अमित झनक हे स्वर्गीय माजी आमदार रामरावजी झनक यांचे नातू व माजी कॅबिनेट मंत्री लोकनेते स्वर्गीय सुभाषरावजी झनक यांचे सुपुत्र आहेत. झनक घराण्यातील ते तिसरे आमदार असून, आजोबा व वडिलांची विजयाची हॅट्रिक साधन्याची परंपरा देखील त्यांनी कायम राखली आहे. पंढरपूरच्या विठ्ठलावरची अघाध भक्ती, काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि शेतकऱ्याप्रती अंतर्मनातून असलेला जिव्हाळा या बळावर आमदार अमित झनक हे अल्पावधीतच “बळीराजा ” म्हणून मतदार संघातील जनतेच्या हृदयात स्थान मिळू शकले.
पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधतांना आमदार अमित झनक म्हणाले, मी सर्वप्रथम एक शेतकरी आहे. वारकरी आणि शेतकरी हे अतूट बंधन आहे. कारण शेती हा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीच्या बाबतीत अक्षरशः असंख्य तपशील त्यांनी शेती करण्याच्या स्वानुभवातून मिळवले होते. त्याचबरोबर शेतीमधील अनुभव आपल्या अभंगातून सांगता सांगता जीवनाच्या सर्व क्षेत्रातून उपयोगी पडणारी व्यापक मार्गदर्शक तत्वे संत तुकोबारायांनी मोठ्या प्रमाणात आपल्या हाती दिली आहेत. म्हणूनच शेतकरी हा वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य घटक म्हणून संबोधला जातो. आषाढी एकादशीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती भावाने साजरा केला जातो. कारण मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाला संत ज्ञानेश्वर माऊली पासून संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत रोहिदास, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत सावता माळी अशी खूप मोठी संतांची परंपरा लाभली आहे. सर्व समाजातील संतांनी समाजाला मानवतेचा व समतेचा संदेश दिला आहे. तो अनुभवायचा असल्यास त्यासाठी प्रत्यक्ष वारीत सहभागी व्हावे लागते. असे देखील आमदार अमित झनक शेवटी म्हणाले. यावेळी दिंडीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.