
जालना प्रतिनिधी
आकाश माने
जालना:-अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू माणिकराव पाचफुले यांना जाहीर करण्यात आला असून, येत्या 20 जुलै रोजी ओडिसा राज्यातील श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथे हा पुरस्कार श्री. पाचफुले यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीचे अध्यक्ष भागवताचार्य ह. भ. प. अतुल महाराज आदमाने शास्त्री यांनी या पुरस्काराची घोषणा करून विष्णू पाचफुले यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपले हिंदु धर्माविषयी असलेले प्रेम, सामाजिक निष्ठा, विविध सामाजिक उपक्रम आपण नेहमी घेत आलेले आहात. जालना शहरातील हिंदु समाजाकरिता आपण जे योगदान दिले आहे, ते पाहता आम्ही आपली “राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार” साठी निवड केली आहे. हा पुरस्कार आपण स्विकारण्याकरिता आपण उपस्थित रहावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हिंदु धर्माविषयी होत असलेले वेगवेगळे संभ्रम दुर करण्याकरिता संतांचे विचार व आपल्या भारतीय संस्कृतिप्रमाणे यज्ञयागादिक कर्मातून धर्माची उंची आबादीत रहावी, या करिता अखिल भारतीय हिंदु राष्ट्र समितीच्यावतीने जगन्नाथपुरी येथे 18 ते 20 जुलैदरम्यान राष्ट्रीय महाविष्णु याग व 20 जुलै रोजी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र समितीची पहिली हिंदु संत परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत गुजरातमधील डभोई येथील बद्रिनाथ पिठाधिश्वर श्री श्री 1008 स्वामी सुदर्शनाचार्यजी महाराज, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, गिता परिवार पुणेचे कोषाध्यक्ष श्रीवल्लभ व्यास, अखिल भारतीय वारकरी मंडळचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्याहस्ते विष्णू पाचफुले यांना राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विष्णू पाचफुले हे गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेत एकनिष्ठपणे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून, ते 15 वर्षापासून शिवसेनेचे जालना शहरप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, शहर संघटक, शहर उपप्रमुख, शहराध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. याशिवाय सलग 3 वेळा ते नगरसेवक आणि पालिकेतील गटनेते राहिलेले आहेत. शिवजयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, श्री गणेश महासंघ आधी विविध समित्यांत त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. सर्व समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून, प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते धावून जातात. कोरोनाच्या काळात मदत, रक्तदान शिबिरांचे आयोजन, दुष्काळ टँकरद्वारे पाणी वाटप आधी महत्वपूर्ण सामाजिक कार्य त्यांच्या हातून झालेले आहे. हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वाज्वल्य हिंदुत्वाचे विचार घेऊन त्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय हिंदू समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे…