दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा.दवणे..
जालना, मंठा पूर्णाकाठच्या १७ गावांतील जप्त साठ्याचा दि. २१ रोजी लिलाव झाला. ‘त्या’ लिलाव झालेल्या साठ्यातील वाळू वाहतुकीसाठी ( दि. २६ ) रोजी मंठा महसूलने परवानगी दिली . मात्र , जप्त वाळू साठ्यातील वाळू लिलावापूर्वीच विक्री करत पुन्हा लिलाव घेतलेल्या साठ्यात रात्रीतुन अतिरिक्त वाळूसाठा केल्याच्या तक्रारी असतानाच काही लिलावधारकांनी वाहतुकीसाठी मुद्दत वाढ मिळावी म्हणून प्रयत्न होताना दिसत आहे.
पुर्णा काठच्या सासखेडा येथील ५८४ ब्रास वाळू वाहतूकीसाठी १५ वाहनांतून २६ जूलै ते १ आगस्टपर्यंत , किर्ला येथील ३६२ ब्रास वाळू वाहतूकीसाठी ६ वाहनांतून २६ ते ३० जूलैपर्यत , टाकळखोपा येथील ३०२ ब्रास वाळू वाहतूकीसाठी १५ वाहनांतून २६ ते २९ जुलैपर्यंत , हनवतखेड्यातील २७६ ब्रास वाळू वाहतुकीसाठी ४ वाहनांतून २६ ते ३० जुलैपर्यंत व लिबंखेडा येथील २१८ ब्रास वाळू वाहतुकीसाठी ५ वाहनांतून २६ ते २९ जुलैपर्यंत यांसह अन्य गावांतील लिलावधारकांना अटी-शर्तीच्या आधीन राहून वाहतुकीची परवानगी दिली आहे .
वाहनांना जीपीआरएस बंधनकारक …
जप्त साठ्यातील वाळू वाहतुकीसाठी ठरवून दिलेल्या वाहनांतुन वाळू वाहतूक करता येईल , ‘ त्या ‘ वाहनांना जीपीएस बंधनकारक आहे .
महसूलचे तपासणीकडे दुर्लक्ष …?
जप्त वाळू साठ्यातील वाळू वाहतुकीला महसूलने परवानगी दिली. मात्र , जप्त वाळू साठ्या ऐवजी इतर ठिकाणाहून तसेच सासखेडा व टाकळखोपा येथुन थेट नदीपात्रातून वाळू चोरी सुरू आहे. त्यांतच ठरवून दिलेल्या वाहनांऐवजी इतर वाहने भरून दिले जात असले तरी महसूलचे तपासणी पथक कुठेच दिसून येत नसल्याने शंका उपस्थित होत आहे .
