
गंगापूर शहरातील घटना ; गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त…
दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधि
गंगापुर:शहरातील अहिल्यादेवी नगरमध्ये एका घरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटून अडीच वर्षांचे बालक गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी
सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून खासगी बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीकडे गावठी कट्टा आला कुठून अशी चर्चा होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या
माहितीनुसार गंगापूर शहरातील नवीन बसस्टँड रोडवर अहिल्यादेवी नगरमधील नवनाथ भराड यांच्या घरात भाड्याने राहत असलेल्या राहुल राठोड (३०, रा. बीड) हा इंडस् बँकेत काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या घरात शुक्रवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्याचा आवाज शेजाऱ्यांनाआला. यावेळी राठोड यांच्या घराकडे धाव घेतली असता, राहुल राठोड व त्याची पत्नी जखमी मुलाला घेऊन तत्काळ दवाखान्यात गेल्याचे समोर आले. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यायासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, पो. नि. ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष राहुल वानखडे, पोलीस कर्मचारी अमोल नांगरे, अभिजित डहाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे करत आहे.
गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त…
उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक ताईतवाले यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना किचन घरामध्ये गावठी कट्टा सापडला. या कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या गेल्या. मॅगझीनमध्ये तीन गोळ्या लोड केलेल्या होत्या यातील दोन गोळ्या झाडल्या गेल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्टा एक जिवंत काडतूस व दोन पुंगळ्या जप्त केल्या.
बँक वसुली कर्मचाऱ्याकडे गावठी कट्टा कसा..?
गंगापूर शहरात फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे गावठी कट्टा आला कुठून, यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. राहूल राठोड या बँकेत वसुली अधिकारी असल्याची माहिती आहे.