
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर ):देगलूर शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया च्या दोन शाखा आहेत. या दोन्ही शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांना विविध कारणास्तव नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.त्यांना विना विलंब पीक कर्ज मिळावे,बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी,शेतकऱ्यांना सिबिल स्कोर न पाहता कर्ज वितरण करावे अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांना काल शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन केली आहे. शहरातील दोन्ही स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखांना जवळपास २० गावे दत्तक आहेत . या गावातील शेतकऱ्यांना या बँकेमार्फत पीक कर्ज दिले जाते. नवीन पीक कर्ज घ्यायचे असेल किंवा वाढीव पीक कर्ज घ्यायचे असेल अशा शेतकऱ्यांच्या फाईल नांदेड येथे पाठवले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास तब्बल एक ते दोन महिना उशीर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती संदर्भातील कामे करण्यास उशीर होत आहे आणि त्यासाठी नाईलाजास्तव खाजगी सावकाराकडून कर्ज घेत आहेत. तरी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध होण्यासाठी देगलूर येथेच कर्ज फाईलींचे काम व्हावे असे निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांना सिबिल स्कोर न पाहता पीक कर्ज द्यावे असा नियम असताना सुद्धा या बँकेकडून सिबिल स्कोर पाहून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तसेच या दोन्ही बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सुद्धा शेतकऱ्यांची कामे व इतर सामान्य कामे सुद्धा वेळेवर होत नाहीत. एसबीआय च्या मोंढा कॉर्नर शाखेत दोन क्लार्क चे पद रिक्त आहेत तर एसबीआय मोंढा शाखेत एक अधिकारी व एक क्लार्क असे दोन्ही बँकेत मिळून एकूण चार पदे रिक्त आहेत. यामुळे ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाहीत. या रिक्त पदावर तात्काळ नियुक्ती करून शेतकऱ्यांचे व ग्राहकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,स्टेट बँक ऑफ इंडिया चे क्षेत्रीय अधिकारी यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पंधरा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.