
राजन विचारेंनी शिंदेंच्या सेनेवर टीका !
ठाणे : गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणावेळी अडगळीत टाकलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची ऐतिहासिक कोनशिला अखेर पुन्हा दर्शनी भागात बसवण्यात आली आहे.
यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ” बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुसणारी ठाण्यातील गद्दार कंपनी अखेर आली ताळ्यावर” असे म्हटले आहे.
करोडो रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतनचे ठाणे महापालिकेने नुकतेच लोकार्पण केले. मात्र, नूतनीकरणादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याची नोंद असलेली ऐतिहासिक कोनशिला अडगळीत टाकल्याचे समोर आले होते. त्यामुळे रसिक, नाट्यप्रेमी आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याप्रकरणी राजन विचारे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम पालिकेला दिला होता. “ही कोनशिला दर्शनी भागात बसवा, अन्यथा आयुक्त दालनात आंदोलन होईल.” असा इशारा विचारे यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कोनशिला पुन्हा नाट्यगृहाच्या दर्शनी भागात बसवली.
बाळासाहेबांची आठवण होत असे
१९७४ मध्ये गडकरी रंगायतनचे भूमिपूजन तर १९७८ मध्ये लोकार्पण बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. यानंतर १९९९ मध्ये झालेल्या नूतनीकरणावेळीही उद्घाटन त्यांच्या हस्तेच पार पडले. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाची कोनशिला रंगायतनच्या प्रवेशद्वारावर अभिमानाने झळकत होती. ही कोनशिला पाहून प्रत्येक शिवसैनिकांना बाळासाहेबांची आठवण होत असे.
गद्दार कंपनी अखेर ताळ्यावर
गडकरी रंगायतनच्या कोनशिला माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुसणारी ठाण्यातील “गद्दार” कंपनी अखेर ताळ्यावर आली. नाव पुसून टाकण्यासाठी अडगळीत बसविलेली गडकरी रंगायतनच्या उद्घाटनाची कोनशिला दर्शनी भागात बसवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वास्तूचा इतिहास लपवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडले. आता ही कोनशिला ठाणेकर रसिक आणि नाट्यप्रेमींना दर्शनी भागात पाहता येणार आहे. कोनशिला समोर दिसताच निष्ठावंत शिवसैनिकांना बाळासाहेबांचे स्मरण होणार आहे, अशी प्रतिक्रिया विचारे यांनी व्यक्त केली आहे.