
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर) : आज रक्षाबंधनानिमित्त येथील मानव्य विकास विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण व संवर्धनाची शपथ घेतली.
शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे शाळेत रोपे लावण्याबरोबरच पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमांमधून मुलांना पर्यावरण रक्षणाची माहितीही मिळते.शाळेच्या आवारात कडुनिंब, पिंपळ, आवळा इत्यादी १०० हून अधिक देशी झाडे आहेत. हरित सेनेच्या माध्यमातून शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.शाळेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून त्रितारांकित व पंचतारांकित शाळा म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.
रक्षाबंधन निमित्त शाळेच्या आवारातील 62 वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडाला विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या.या राख्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवल्या होत्या, या राख्यांवर पर्यावरणासंदर्भात विविध घोषणा लिहिल्या होत्या, जे आकर्षणाचे केंद्र ठरले. .
वृक्ष माझा सखा-वृक्ष माझा सोबती , वृक्ष संरक्षण – रक्षाबंधन, वृक्ष वाचवा जीवन वाचवा,अशा विविध संदेश राख्यावर लिहिले होते.
या कार्यक्रमात इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे, शालेय पोषण आहार चे अधीक्षक एम.के.मणियार, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर झंपलवाड , पर्यवेक्षक शरद हांद्रे, सुजित कांबळे, बालाजी पिंडकुरवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचेअध्यक्ष शिवानंद स्वामी, उपाध्यक्ष अर्जुन सुंकेवार , श्याम कोल्हे,शिक्षक प्रतिनिधी संजय कल्याणी, एनसीसी कमांडर गिरीश पारसेवार आदींनी परिश्रम घेतले.