
लष्करी जवानाने पाठलाग केला; पण…
नाशिकरोड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले अधिकच वाढले आहेत. वडनेर दुमाला गावाच्या मुख्य चौकात तोफखाना केंद्राच्या प्रवेशद्वारालगत आतील बाजूने लष्करी जवानांची वसाहत आहे.
या वसाहतीत मंळवारी रात्री अंगणात खेळणाऱ्या दोन वर्षाच्या बालकाला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेले. मुलाला बिबट्या नेत असल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी बिबट्याचा पाठलागही केला. परंतु, बिबट्या भिंत ओलांडून पसार झाला. वन विभागाच्या पथकांसह आर्टिलरी सेंटरमधील जवानांकडून रात्री उशीरापर्यंत बालकाचा शोध घेण्यात आला. परंतु, तो सापडला नाही.
वडनेर दुमाला परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा हा मागील काही दिवसातील दुसरा मृत्यू आहे. पाथर्डी – वडनेर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आर्टिलरी सेंटरचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी जंगल आहे. या जंगलातून बिबट्या लष्करी जवानांच्या वसाहतीत आला. रात्री पावणेदहाच्या सुमारास वसाहतीत घराच्या ओट्यावर श्रृतीक गंगाधरन हा दोन वर्षांचा बालक खेळत होता. त्याचे वडीलही जवळच होते. तितक्यात बिबट्या आला.
काही कळण्याच्या आत त्याने श्रृतीकला धरले. तो त्याला फरफटत घेऊन जाऊ लागला. गंगाधरन यांनी आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला. परंतु, जवळील केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरुन उडी मारुन तो फरार झाला. सुमारे शंभर मीटरपर्यंत श्रृतीकचे वडील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. परंतु, उपयोग झाला नाही. या सर्व प्रकाराची माहिती वन विभागाला देण्यात आल्यावर वन विभाग परिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत बिबट्या आणि बालकाचा शोध सुरू होता. परंतु, तो सापडला नाही.श्रृतीक याला बिबट्याने नेल्याने त्याचे वडील आणि आईला जबर धक्का बसला आहे. धक्क्याने आईला रुग्णालयात दाखल करावे लागले.
आयुषनंतर श्रृतीक
रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी वडनेर दुमाला परिसरातील शेत परिसरात आपल्या मोठ्या बहिणीबरोबर तीन वर्षांचा आयुष खेळत होता. त्यावेळी शेतातून आलेल्या बिबट्याने आयुषला बहिणीदेखत फरफडत नेले होते. त्यावेळी परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येत वनविभागावर धडक मोर्चा काढून बिबट्याला जेरबंद करा, अशी मागणी केली होती. वनमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर अवघ्या २४ तासात एक बिबट्या जेरबंद झाला होता. आयुषच्या मृत्युनंतर या भागातून अवघ्या तीन किलोमीटरच्या परिसरातून एकापाठोपाठ तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. यासाठी परिसरात १५ हून अधिक पिंजरे लावत ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती.