
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 29 सप्टें पिंपळे सौदागर (पुणे )
पिंपळे सौदागर येथील राधाई नगरी सोसायटीतील रहिवाशांनी अंतर्गत व्यवस्था करून सोसायटीतील सार्वजनिक गणपती विसर्जन अगदी थाटामाटात पार पाडले. त्यांच्या या उपक्रमामुळे सोसायटीतील इतर गणपतीचे सुद्धा विसर्जन याच पर्यायी टॅंक मध्ये करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमामुळे घाटावरील गर्दीच्या ठिकाणी विसर्जन करण्याचे टाळण्यात आले व तसेच हा विसर्जन सोहळा नैसर्गिकरित्या पार पाडता आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे 350 वे वर्ष आणि ह्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील रहिवाशांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळ्यातील सिंहासनाची “मेघडंबरी” ची एक प्रतिकृती करण्याचा प्रयत्न गणपती देखावा या माध्यमातून केला आहे .
हा देखावा साकार करताना *”टाकाऊ तून शिकाऊ” ही सुद्धा संकल्पना त्यांनी अमलात आणली आहे. देखावा साकार करण्यासाठी वापरात नसलेले प्लायवुड, एमडीएफ बोर्ड, पॅकेजिंग बॉक्स आणि उरलेले पाईप यांचा वापर करत हे सिंहासन तयार करण्यात आले आहे. त्यातील नक्षीकाम करण्यासाठी “क्ले” चा वापर करण्यात आला आहे.
ही संकल्पना उभी करण्यामध्ये राधाई नगरी मधील रहिवासी अदिती तेप्पलवार आणि कविता पानगंटी या दोन कुशल महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. अनुपयोगी वस्तूंचा असा रचनात्मक वापर करून संकल्पना आणि सादरीकरण ह्याचा उत्कृष्ट मेळ साधला गेला आहे. ह्या संकल्पनेला अनुसरून शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित नाट्य सोसायटीच्या लहान मुलांनी सादर केले.