
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):काटी येथील काटेश्वर विद्यालयात तब्बल २८ वर्षांनी सर्व शालेय मित्र असलेले माजी विद्यार्थी एकत्र आले व पुन्हा एकदा शाळा भरली. 28 वर्षा पूर्वी हरवलेली पाखरे पुन्हां एकदा एकत्र आली आणि एकच किलबिलाट झाला. तसं पाहिलं तर सर्वजणच घर, शहर, नातेवाईक आणि मित्रांपासून दुरावरतात. त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्यासाठी गरज भासते आणि मग सर्वांना एकदाच भेटता यावे यासाठी खटाटोप सुरू होतो. त्यामधूनच गेट टूगेदर ही संकल्पना एखाद्याला सुचते आणि मग डेस्टिनेशन गेट टूगेदरचा प्लॅन ठरतो. हा प्लॅन सर्वांसाठीच सोयीस्कर असण्याबरोबरच एन्जॉय करण्यासाठी पूरक असल्याने अगदी ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वांमध्ये डेस्टिनेशन गेट टूगेदर हिट ठरते आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला व तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
एकमेकांचे बदलेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल २८ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. काटी येथील हायस्कूलमध्ये १९९१ ते १९९५ या कालावधीत पाचवी ते दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक – एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला.
या कामासाठी काही उत्साही वर्ग मित्र व इतरांनी त्यांना मदत केली. सर्व वर्ग मित्रांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर गेट-टू-गेदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरले. यानुसार एक दिवसीय ‘दिल दोस्ती दुबारा-१९९५’ हा गेट-टू-गेदर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच खेळ, गप्पा, मस्ती करण्यात आली.
यानंतर सर्वांनीच काटी येथील शाळेत येऊन आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच मागील २८ वर्षाच्या काळातील आपापल्या आयुष्यातील सुखदुःखाचे प्रसंग यावेळी एकमेकांशी शेअर केले.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व आताचे पुणे शहर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी आपल्या शालेय जीवनापासून ते आजपर्यंतच्या यशामध्ये किती अडचणी आल्या या काळात माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी खुप मोलाचे सहकार्य केले.आज जे मी यश संपादन केले आहे यामध्ये माझ्या कुटुंबीयांबरोबरच माझ्या जीवाभावाच्या मित्रांचे खूप योगदान आहे त्याबद्दल मी सर्व मित्रांचे खूप खूप आभार मानतो असे यावेळी त्यांनी सांगितले.
यानंतर शिक्षणाच्या वेळी ज्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असे या शिक्षकांना निमंत्रित करून त्यांचा शाळेत शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.या नंतर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे जेवण करून एकमेकांनचा निरोप घेतला यावेळी नियोजन समितीचे भागवत राऊत ,विकास मिसाळ, बाबासाहेब दोलतोडे, नंदकिशोर शिंदे, संजय टेकाळे, जितेंद्र मिसाळ,आप्पा व्हेव्हारे विष्णू कोकरे, कांचन खरात, सुवर्णा सोनवणे, छाया पडसळकर, निर्मला खटके यांनी स्वयंसपूर्तीने कार्यक्रमाच्या विविध जबाबदाऱ्या उचलून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.