वाहनतळाचे कंत्राट संपूनही वर्षभरापासून कंत्राटदार वाहनचालकांकडून बेकायदा पद्धतीने शुल्काची वसुली करीत आहे. याचबरोबर कंत्राटदाराने ससून प्रशासनाला वाहनतळाचे दरमहा दीड लाख रुपयांचे शुल्कही दिले नसल्याची धक्कादायक बाब समोर झाली आहे. ससूनच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.वाहनतळापोटी कंत्राटदाराने महिन्याला १ लाख ५१ हजार ५०० रुपये शुल्क मिळणे अपेक्षित आहे. कंत्राट संपल्यापासून मागील वर्षभराचे शुल्क न भरताच त्याच्याकडून वाहनतळ चालविला जात आहे. कंत्राटदाराने काही धनादेशही प्रशासनाला दिले होते. हे धनादेश बँकेत जमा करण्यात आले की नाही याबद्दल रुग्णालय प्रशासन मौन बाळगून आहेत. कालावधी संपूनही कंत्राटदार वाहनचालकांकडून कोणत्या आधारावर शुल्क वसुली करीत आहे, याचे उत्तरही रुग्णालय प्रशासनाकडे नाही.रुग्णालयाच्या आवारात चार ठिकाणी वाहनतळ आहेत. दुचाकी वाहनचालकांकडून पहिल्या दोन तासांसाठी ५ रुपये, १२ तासांसाठी १० रुपये आणि २४ तासांसाठी १५ रुपये शुल्क आकारले जाते. मोटार, जीप, रिक्षा आणि इतर वाहनांना पहिल्या २ तासांसाठी १०, १२ तासांसाठी २५ आणि २४ तासांसाटी ४० रुपये शुल्क आकारले जाते. प्रत्यक्षात वाहतनळावरील कर्मचारी पहिल्या दोन तासांसाठी १० रुपये शुल्क आकारत आहेत.ससून रुग्णालयातील वाहनतळ चालविण्याचे कंत्राट एस.के. एंटरप्रायजेस या कंपनीला नोव्हेंबर २०२० मध्ये देण्यात आले होते. हे कंत्राट दोन वर्षांसाठी होते. या कंत्राटाची मुदत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आली. ससून रुग्णालयातील वाहनतळाबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्यात आली होती. त्यावर ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या उत्तरात कंत्राटाचा कालावधी संपल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. याचबरोबर करारावर ससूनच्या अधिष्ठात्यांची स्वाक्षरीही नसल्याचे समोर आले आहे. करार संपूनही बेकायदा पद्धतीने कंत्राटदाराकडून वाहनतळ चालविला जात असून, वाहनचालकांकडून वसुली सुरू आहे.
Related Stories
5 hours ago