
मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची शासनाने काळजी घेण्याची मागणी
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला असून त्यावर मंगळवारी चर्चा झाली. आ. मोहन आण्णा हंबर्डे यांनीही आपल्या मुद्देसुद व आक्रमक भाषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून या गंभीर व जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शासनाने आश्वासन दिले असून त्याची तात्काळ पुर्तता करावी आणि आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जीवाचे राण करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील एका जाहीरसभेत भाषणा दरम्यान अचानक खाली बसले. ते सध्या आंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल असुन त्यांच्या तब्येतीचीही शासनाने काळजी घ्यावी, अशीही मागणी आ. मोहन आण्णा हंबर्डे यांनी केली.