
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर : १ जानेवारी १८४८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. यासाठी दरवर्षी फुले दांपत्य सन्मान दिन साजरा करण्यात येतो. फुले दाम्पत्याच्या सन्मानार्थ भिडेवाडा ते फुलेवाडा अशी महारँली १ जानेवारी २०२४ रोजी माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहान माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले आहे.
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे , प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश संयोजक संतोष अण्णा लोंढे, प्रदेश मार्गदर्शक काळुराम अण्णा गायकवाड व रॅलीचे संयोजक दीपक जगताप यांनी या कार्यक्रमासाठी उत्तम नियोजन केले आहे. माळी महासंघाच्या वतीने गत नऊ वर्षापासून या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसह फुले दांपत्यांच्या सन्मानार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाच्या निर्माणाचे सर्व अडथळे दूर होवून येत्या काही दिवसात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक निर्माणाचे कार्य सुरू होत आहे, यासाठी गेल्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी पन्नास कोटी रुपयाची तरतूद देखील केली आहे , माळी महासंघाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धता म्हणावी लागेल.
फुले दांपत्यांच्या सन्मानासाठी तसेच मिळालेल्या यशाचा जल्लोष करण्यासाठी व ओबीसींचे आरक्षण सुरक्षित रहावे, यासाठी माळी समाज बांधवांनी या महारॅलीमध्ये सहभागी व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे यासाठी माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पोपट माळी सर , विश्वस्त भारत माळी , प्रदेश सचिव राजीव बनकर , जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे सर आदींसह अनेक मान्यवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यातून अधिक समाज बांधव व भगिनी ची संख्या निघावी यासाठी माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत .