
वार सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी2024मी माझ्या मित्रांबरोबर धाराशिव या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त आयोजित निमंत्रित कवींच्या कवी संमेलनातील कविता ऐकण्यासाठी गेलो होतो . यामध्ये रामदास फुटाणे ‘नारायण पुरी व इतर कवींच्या कविता ऐकल्या आणि रात्री साडेअकरा वाजता परत आम्ही गावी निघालो . यावेळी गाडीतील एक मित्र अगदी त्वेषाने आपल्या राज्यातील , जिल्ह्यातील , तालुक्यातील , गावातील अविवाहित तरुणांबद्दल बोलत होता.त्याचे म्हणणे असे होते की नोकरदारांचा पगार वीस ते पंचवीस हजार रुपये केला पाहिजे कारण आज तालुक्यातील ७५० पेक्षा जास्त तरुणांचा विवाह होत नाही . त्याला कारण कोणीही या शेतकरी मुलांना मुलगीच देत नाही . जो तो नोकरदार हवा असे म्हणत आहे . जर या ७५० मुलांचा विवाह झाला नाही तर येणाऱ्या काळात ७५० जणांचा वंश बुडेल कारण ते मुलांना जन्माला घालू शकणार नाहीत . यामुळे येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यातील दोन ते तीन हजार मतदार कमी होईल आणि हा खूप मोठा धोका आहे . यावर दुसरा मित्र गांभीर्याने म्हणाला , “अरे बाबा याला जबाबदार कोण आहे ?याला जबाबदार सरकार आहे .कारण गेल्या दहा -वीस वर्षांपूर्वी शिकल्या सवरल्या माणसांनी वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा गैरवापर केला आणि अनेक कळ्यांना उमलण्यापूर्वीच खुडून टाकले . त्यामुळे मुलींचा जन्मदर कमी झाला त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागत आहेत . ” यावर तिसरा मित्र म्हणाला, ” असा प्रकार जर शिवाजी महाराजांच्या काळात घडला असता तर महाराजांनी या नराधमांना फासावर लटकवलं असतं .”यावर चौथा मित्र म्हणाला, ” अरे !बाबांनो मुलींची संख्या जरी कमी असली तरी प्रमाण इतके कमी नाही .परंतु आज आपल्या देशातील तरुणांच्या हाताला कामच मिळत नाही . नुसता घोषणांचा भडीमार चालू आहे जर तरुणांना काम मिळालं तर त्यांची लग्न व्हायला वेळ लागणार नाही . काम नसल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य आले आहे .राजांच्या काळात आम जनता कामात मग्न असायची . आज एक जाहिरात निघते . तिची परीक्षा होते .तोपर्यंत झालेल्या परीक्षेचा पेपर फुटलेला असतो .याच्यामध्ये वर्ष दोन वर्ष निघून जातात . प्रकरण कोर्टात अडकते . यामुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .सरकारचा खाजगीकरणावर जोर वाढलेला आहे .शासनाने शासकीय कार्यालयातील अनेक विभागातील रिक्त जागांचा अनुशेष भरलेला नाही .यामुळे शासकीय यंत्रणा काम करताना मेटाकुठीला येत आहे . याचा परिणाम शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे .नोकर भरती करून सुशिक्षित बेरोजगारांना काम देता येईल पण असे होताना दिसत नाही . याला जबाबदार कोण ? असा प्रकार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडताना दिसत नाही . त्यामुळे जनता सुखी होती. ” यावर दुसरा मित्र म्हणाला , “तुमच्या सगळ्या समस्या आणि चर्चा ऐकून मला असे वाटते की जोपर्यंत आपण धर्माच्या बेगडीतून बाहेर पडणार नाही आणि कोणतेही काम करण्यास लाजणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान करताना जात , धर्म, पंथ आणि चिन्ह न पाहता रोजगार आणि विकास हा झेंडा पाहून एक रुपयाही न घेता मतदान करणार नाही तोपर्यंत आपणाला या समस्येवरचा उपाय सापडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्या मावळ्यांपुढे आणि जनतेपुढे हा किल्ला घेतला तर हा किल्ला बांधला तर त्याचा आपल्या स्वराज्याला आणि रयतेला कसा फायदा होईल हे सांगत होते . आज मात्र वैयक्तिक स्वार्थापुढे पुढारी तत्त्वहीन वागताना दिसत आहेत . म्हणून आपण सर्वजण या शिवजयंती दिनी एक शपथ घेऊया आपल्या देशातील बेकारी दूर करण्यासाठी मतदान करताना विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष देऊन मतदान करूया.राजांचा आदर्श समोर ठेवूया .
तात्या कांबळे
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद हायस्कूल ,भूम
जिल्हा – धाराशिव