
अद्भुत तो सोहळा, विठ्ठल विठ्ठल गजरी ह भ प श्रीराम महाराज भगत : एक तरी वारी अनुभवावी
दैनिक चालू वार्ता
राजेंद्र पिसे
माळशिरस प्रतिनिधी
नातेपुते प्रतिनिधी : आषाढाची चाहूल लागली
हा आनंदाचा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे दि.२८ जून रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान व दि,२९ जून रोजी कैवल्य चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान वेळापत्रक जाहीर झाले आहे. संतांनी घालून दिलेला हा परिपाठ पिढ्यान् पिढ्या सांभाळणे सोपे नाही. त्यासाठी एक महिन्या अधी वारीची तयारी केली जाते. कुटुंबातील किती जणांनी अन् कुणी वारीला जावे, यासाठी प्रेमळ चढाओढ लागते. एकदा निर्णय झाला, की तयारी सुरू होते, थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी भाविक पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तिर्थव्रत,ll असे सात्विक अभिमानाने सांगत वारीला निघतो. सकळांशी येथे आहे अधिकार । कलियुगी उध्दार हरिच्या नामे॥ अशी साधी,सोपी आणि सरळ भक्तीची शिकवण देणार्या भाविक वारकर्याना वारी म्हणजे आयुष्याचे सार्थक करणारा सोहळा आणि साधना. एर्हवी वारकरी लौकीक गोष्टीला कधीही महत्व देत नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा । घ्यावी माझी सेवा भाव शुध्द॥ असा दंडक असणार्या भाविक वारकर्याला अंतकरण पूर्वक विठ्ठलाची भक्ती करणेच आवडते.आषाढी कार्तिक पंढरीची वारी । साधन निर्धारी आण नाही॥’ असा वारकरी भक्ताचा ठाम निर्धार असतो, वारकरी भाविक पायी वारीला मोक्षाचा मार्ग समजतात. ‘पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे॥ याचाच अर्थ वारी म्हणजेच मोक्ष.मानवी जीवनात परमपुरुषार्थ प्राप्त करावा अशी सर्वांचीच इच्छा असते.तो वारकरी भक्ताला वारीत दिसतो भेटतो आणि याची देही याची डोळा अनुभवण्यास मिळतो. पंढरपूरच्या वारीतला आनंद हा सुखसोहळा स्वर्गी नाही’ अशाच स्वरुपाचा असतो. गात जागा, गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ असे भजन म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने चालत राहतो वारकर्यांच्या भजनात सात्विकता तर असतेच शिवाय प्रबोधनही असते. हरिनाम, अभंग गायण, नामस्मरण, वारकरी भजनाच्या चाली, नाद पावले यामध्ये वारकरी भाविक आनंदमय होऊन जातो, व ताल आणि तोल या दोन्हीतही वारकरी पक्का असतो. निष्काम भक्तीचे प्रतिक म्हणजे वारकरी. म्हणून लाखो भाविक भक्त एकत्र येऊन पायी वारी करतात तेव्हा ती एक चळवळ असते, यातून परिवर्तन घडते सुसंस्काराचे आदान प्रदान घडत असते.अतिरेक विचार नष्ट होतात. समाजामध्ये एकोपा निर्माण होतो. प्रत्येकाने एक तरी वारी अनुभवावी आणि वारकरी म्हणून सहभागी झाले पाहिजे मग खरा आनंद काय असतो ते कळते वारी हा देखावा नसून तो एक जीवनातील आनंदाचा संस्कार सोहळा आहे. हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी।। ह भ प, श्रीराम महाराज भगत, नातेपुते, तालुका माळशिरस