- दै.चालू वार्ता उपसंपादक आष्टी
अवधूत शेंद्रे
वर्धा – कारंजा(घा):- शहरातील नागरिकांच्या घरातून गोळा केलेला कचरा नागरी वस्तीपासून अगदी १०० मीटरच्या आतच सर्विस रोडच्या बाजूलाच टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात साठवलेला आहे. आणि त्यामधून दुर्गंधी सुटत असल्याकारणाने सदर कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी कारंजा(घा) नागरी समस्या संघर्ष समितीने नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.यात असे म्हटले आहे की, कारंजा शहरातील नागरिकांकडून घंटागाडीच्या माध्यमातून ओला , सुका व इतर प्रकारचा सर्व कचरा एकत्र गोळा करून अगदी शहरालगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी व सर्विस रोडच्या बाजूला साठविला जात आहे. तो कचऱ्याचा ढिगारा दीर्घ कालावधीपर्यंत तसाच साचून राहतो. त्या कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची तांत्रिक विलगीकरणाची प्रक्रिया होत नाही. पाऊस आल्यानंतर त्या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. पुलाच्या पलीकडे लगतच १०० मीटर अंतरावर नागरी वस्ती असल्याकारणाने त्या दुर्गंधीचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो, हे नाकारता येणार नाही. शहर प्रवेशाच्या अगदी दर्शनी भागालाच सदर कचरा डेपो आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कचरा डेपो पासून १०० ते १५० मीटर अंतरावर विठ्ठल मंदिर, साई मंदिर ही धार्मिक स्थळे आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह आहे, धान्याचे शासकीय गोडाऊन आहे. आणि तहसील कार्यालय सुद्धा आहे. यापूर्वी दोन-तीनदा त्या कचरा डेपोला आग सुद्धा लागलेली आहे ४ वर्षांपूर्वी मुख्याधिकारी पल्लवी राऊत असताना मजुराद्वारे कचऱ्याचे विलगीकरण केल्या जात होते. कचऱ्यापासून काही प्रमाणात कंपोस्ट खत सुद्धा तयार केल्या जायचे. त्यांच्याच कार्यकाळात शासनाकडून स्वच्छतेचा पुरस्कार सुद्धा कारंजा नगरपंचायत ला मिळालेला आहे. परंतु अलीकडे मात्र एकत्रित गोळा केलेल्या कचऱ्याचा केवळ ढिगारा साठविला जात आहे. आणि त्या ढिगार्यातून दुर्गंधी सुटत आहे. अडीच वर्षांपूर्वी नगरपंचायतने कचरा डेपो करीता अडीच एकर जागा खरेदी केल्याचे सांगितल्या जात आहे. कचरा विलगीकरणाच्या मशिनरी एक वर्षापासून नगरपंचायत मध्ये येऊन धुळखात पडलेल्या आहे. परंतु अजून पर्यंत कचरा डेपोचे बांधकाम आणि कचऱ्यावर तांत्रिक पद्धतीने विलगीकरणाची प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही. कचरा विलगीकरणाचा दिवस कधी उजाडणार ? असा प्रश्न नागरी समितीने उपस्थित केला आहे.परिणामी परिसरात पसरणारी दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य आणि संभाव्य धोके लक्षात घेता सदर कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर स्थलांतरित करावा या मागणीसह
” स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत १५२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापनास शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता दिनांक २० मार्च २०२३ रोजी मिळालेली आहे. त्यामध्ये कारंजा नगरपंचायतचा समावेश आहे. नगरपंचायतने त्या प्रकल्पावर जलद गतीने काम करावे.नगरपंचायत द्वारा कचरा डेपोचे नागरी वस्ती पासून दूर स्थलांतरण करून त्या कचऱ्याचे यांत्रिक पद्धतीने विलगीकरण व बायोमिनिंग केले नाही आणि जर नागरिकांना कचऱ्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा असाच त्रास होत राहिला तर नाइलाजास्तव नागरी समितीला राष्ट्रीय हरित अधिकरण (एनजीटी) कडे दाद मागावी लागेल असे ही कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी नगरपंचायत अधिकारी कुमरे,गटनेता नितीन दर्यापूरकर,नगरसेवक कमलेश कठाने यांनी स्वीकारले तर नागरी समस्या संघर्ष समितीसह विविध मंडळ,मंच आणि संघटना पदाधिकारी हजर होते
