
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना -जालना शहर महानगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकाला 5000 रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 21 रोजी रंगेहात पकडले आहे. सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.h
जालना शहर महानगरपालिकेत वर्ग 3 चा स्वच्छता निरीक्षक शामसन बाबुराव कसबे वय 49 वर्ष, याच्या गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छते संदर्भात आणि एकंदरीतच आर्थिक व्यवहारावरून तक्रारी होत्या. परंतु किरकोळ रक्कम असल्यामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. वरील प्रकरणांमध्ये जालना शहरात महानगरपालिकेची परवानगी न घेता एक अनाधिकृत बांधकाम सुरू होते. यासंदर्भात महानगरपालिका प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 कलम 53(1) अन्वये संबंधित बांधकाम मालकाला नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस रद्द करावी म्हणून सॅमसन कसबे याने दिनांक 20 जून रोजी साक्षीदारासमक्ष तक्रारदाराला पाच हजार रुपयांची लाच मागितली, परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला टाळून छत्रपती संभाजी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला . दिनांक 21 रोजी पंचा समक्ष पाच हजार रुपयांची लाच घेताना या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सॅमसन बाबुराव कसबे या स्वच्छता निरीक्षकाला रंगेहात पकडले आहे .सदर बाजार पोलीस ठाण्यात सॅमसन कसबे विरोधात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे आणि पोलीस निरीक्षक केशव शिंदे यांच्या पथकाने जालन्यात कारवाई केली.