
बेवारस कुत्र्यांमुळे देगलूरातिल नागरिक त्रस्त.
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):
देगलूर शहराच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने लहान बालकांसह इतर २० ते २५ नागरिकांना चावा घेतला असून यापैकी १५ रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
देगलूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या फुलेनगर, जिया कॉलनी, दत्तनगर बापू नगर परिसरात गेल्या कांही दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा अनेकांना चावत आहे असल्याची चर्चा होती. दि.२३ जून रोजी या लाल रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने लहान मुलांसहित २० ते २५ जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केलेले रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली लस देण्यात आली असून अँटी रेबीज सिरम (ए आर एस) ही लस देण्यासाठी १५ रुग्णांना नांदेडला पाठविण्यात आले आहे. या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आज दिवसभरात पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील लहान मोठ्या एकूण २० जणांना चावा घेतला असून या सर्वांना रुग्णालयात उपलब्ध असलेली ऑंटी रेबीज व्हॅक्सिन (ए आर व्ही) ही लस देण्यात आली असून अँटी रेबीज सिरम(एअरएस) या रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे १५ रुग्णांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.