
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : सामाजिक उन्नतीसाठी मानवता धर्म जोपासला गेला पाहिजे. आज आपापसातला प्रेमभाव कमी होत चाललेला आहे. अशा वादळी परिस्थितीत मानवी भावना जोपासण्याच्या प्रवासात किती अडथळे येतात आणि त्यातूनही कशी वाट काढावी लागते यावर सविस्तर असे विचार प्रा. डॉ.अजय खडसे, अमरावती यांनी मांडले.
प्रा. अनिल चवळे अहमदपूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 322 व्या वाचक संवादामध्ये अमरावती येथील प्रा. डॉ. अजय खडसे यांनी अशोक थोरात लिखित वादळातल्या प्रवासात या साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधला. यावेळी त्यांनी थोरात यांच्या कवितेतले विविध अंग त्यातील सामाजिकता आणि रोमँटिकता त्याचबरोबर अभंग, गझल व फजल अशा विविध प्रकारातील त्यांचे लेखन, वाट्याला आलेले अपंगत्व आणि त्यामुळे होणारा प्रेमभंग यातूनही त्यांनी मानवतेचा धर्म जोपासणाऱ्या विचाराने केलेले लेखन यावर सविस्तर असा संवाद साधला.
यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव मुरलीधर यांनी केले, संवादकांचा परिचय प्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांनी करून दिला. तर आभार रामभाऊ जाधव यांनी मांडले. या कार्यक्रमास प्रसिद्ध चित्रपट निर्माते चंद्रशेखर तारे यांचे सह प्राचार्य डॉ. मोहन उमाटाळे यांच्यासह परिसरातील अनेक वाचक, लेखक, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.