एकनाथ शिंदे:- राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आता पुढे काय घडणार कोण कोणत्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशात महायुतीला त्यांची लाडकी बहीण योजना किती फायद्याची ठरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. आता यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे ज्याची तुफान चर्चा होतेय.
CM एकनाथ शिंदेंचं ‘लाडकी बहीण योजने’बाबत महत्त्वाचं वक्तव्य काय..?
मुक्ताईनगर येथे सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे भाषण करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही तर कॉमन मॅन आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. उलट राज्यात आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.
