
गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्यात विस्तवही जात नाही, असे चित्र आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर २०२४ ला तर काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने शिवसेना उबाठाच्या सांगण्यावरून नाना पटोले यांना ‘मविआ’च्या जागावाटाप बोलणीतून बाहेर काढले आणि चर्चेची जबाबदारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली.
यामुळे निवडणुकीनंतर कदाचित ‘मविआ’ला बहुमत मिळालेच आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवण्याची वेळ आलीच तर नाना पटोले यांचे नाव स्पर्धेतही नसेल, याचा बंदोबस्त शिवसेना उबाठाने केल्याचे बोलले जात आहे.
उबाठा भूमिकेवर काँग्रेसमध्ये संताप..!
लोकसभा निवडणुकीपूर्वी जसे शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीतून जागावाटप करून घेतले, ज्यात उबाठाला ४८ पैकी २१ जागा मिळाल्या, तीच रणनीती उबाठाने विधानसभा निवडणुकीतही वापरल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास नसल्याने ठाकरे थेट गांधी यांच्याशी चर्चा करून हवे ते पदरात पाडून घेत असल्याबद्दल काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
काँग्रेसची ताकद वाढली..!
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान उबाठाची दादागिरी काँग्रेसने सहन केली कारण काँग्रेसचा राज्यात एकही खासदार नव्हता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात शेवटच्या क्रमांकावर असलेला काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर आला. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली. परिणामी, नाना पटोले यांनी शिवसेना उबाठाची मनमानी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत काँग्रेसहिताचा विचार करून अधिकाधिक जागा मिळवण्यावर भर दिला. उबाठाने मात्र पटोले यांची खेळी ओळखून थेट दिल्लीशी संपर्क करण्यास सुरुवात केली आणि पटोले यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
नानांची प्रतिमा भांडखोर, असमंजस
यामुळे नाना पटोले यांची प्रतिमा भांडखोर आणि असमंजस, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती नाही अशी करण्यात उबाठाला यश आले आणि आपोआपच नाना भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतूनही बाहेर फेकले गेले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.