
माजी महिला कुस्तीपटू बबिता फोगटने तिच्या आणि तिच्या कुटुंबावर बनलेल्या दंगल चित्रपटाबाबत मोठा दावा केला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि जवळपास 2 हजार कोटींची कमाई केली होती…
गीता आणि बबिता यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख या चित्रपटात करण्यात आला होता. तसेच सुपरस्टार आमिर खान याने गीता आणि बबिता यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. मात्र या सुपरहिट चित्रपटासाठी फोगट कुटुंबाला केवळ 1 कोटी रुपये मिळाल्याचा दावा बबिता फोगटने केला आहे…
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना बबिता फोगट सांगितले की, दंगल चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर जगभरात 2000 कोटी रुपये कमावले होते. मात्र त्यापैकी फक्त 1 कोटी रुपये फोगट कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती दिली. मात्र बबिता फोगच्या उत्तराने अँकरला आश्चर्य वाटले आणि तिने पुन्हा एकदा विचारले की, हे खरं आहे का? यावर बबीता फोगटने म्हटले की, हो हे खरे आहे. यानंतर अँकरने तिला विचारले की, एवढे कमी पैसे मिळाल्यामुळे निराशा झाली का? या प्रश्नावर बबिता म्हणाली की, निरास नाही झाले. कारण माझ्या वडिलांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, आपल्याला लोकांचे प्रेम आणि आदर हवा आहे. दंगल चित्रपटाने 2 हजार कोटी रुपये कमावले, पण फोगट कुटुंबाला फक्त 1 कोटी रुपये दिल्याने सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे…
दंगल चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित झाला होता. नितीश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात आमिर खानने महावीर फोगटची यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तो या चित्रपटाचा सह-निर्माता देखील होता. या चित्रपटात महावीर फोगट यांच्या जीवनाचा प्रवास आणि मुलगा नसताना त्यांनी आपल्या मुलींना कुस्ती या खेळात कसा परिचय करून दिला. तसेच छोट्या-छोट्या स्पर्धांमधून मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदके कशी मिळवली, याचे चित्रण करण्यात आले आहे.
दरम्यान, बबिता फोगटची कुस्ती कारकीर्द चमकदार राहिली आहे. तिने 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक आणि 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. याशिवाय 2012 मध्ये तिने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु तिला पदक जिंकता आले नाही. यानंतर बबिता फोगटने 2019 मध्ये कुस्तीला अलविदा करत राजकारणात प्रवेश केला आहे…