
पुणे:लोकसभा निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात विधानसभेलाही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. नणंद भावजय नंतर आता बारामतीत काका-पुतण्याची लढाई रंगणार आहे.
युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिकिट दिलं आहे. तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहेत. बारामतीमध्ये होणाऱ्या या लढतीबाबत बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. बारामतीकरांना कुणालाही विचारा सहा सात वेळा मला त्यांनी विजयी केलंय त्यामुळे निकाल लागल्यावर चित्र स्पष्ट होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी मोठी लढत होणार आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण लोकसभेला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे सुनेत्रा पवारांना उभं करुन चूक केल्याचे अजित पवारांनी मान्य केलं होतं. मात्र आता विधानसभा निवडणुकीबाबात विचारले असता बारामतीकरांवर मला विश्वास असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“निवडणुकीमध्ये हे चालते. उद्या तुम्हीही फॉर्म भरु शकता. बारामतीकर मतदार सुज्ञ आहेत. मला त्यांच्यावर विश्वास आहे. फॉर्म भरल्यानंतर २३ तारखेला मतमोजणी झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. बारामतीकरांना कुणालाही विचारा सहा सात वेळा मला त्यांनी विजयी केलं आहे. महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघावर नजर टाका आणि माझ्या मतदारसंघावर नजर टाका जेवढं काही शक्य होतं तेवढं काम मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला. मी ज्यावेळी उभा होतो तेव्हा त्यांनी साथ दिली. बारामतीकर माझं घर आहे, ते माझं कुटुंब आहे. मी माझी भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्रात फिरताना मी ताठ मानेने फिरेल असा निकाल बारामतीकर देतील,” असा दावा अजित पवार यांनी केला.
यावेळी पत्रकारांनी त्यांना बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होतेय त्यामुळे त्याकडे कसं बघता असं विचारलं. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तू जसे बघतो आहे तसेच मी बघतो असं मिश्किलपणे उत्तर दिल्यानंतर हशा पिकला.
दरम्यान, अजित पवार गटाने शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिले आहे. याशिवाय इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महाकाळमधून संजयकाका रामचंद्र पाटील, अणुशक्ती नगरमधून सना मलिक, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, शिरूरमधून ज्ञानेश्वर (माऊली) कटके आणि लोहामधून प्रताप पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे…