
पुणे:महाविकास आघाडीत जागांवरून बरीच ताणाताणी झाली होती. अशीच चढाओढ पुणे शहरातील हडपसरच्या जागेवरून झाली. येथे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील चेतन तुपे आमदार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा सांगितला होता.
मात्र, शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एका उमेदवाराचं नाव घोषित केलं होतं. पण, गुरूवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हडपसरमधून उमेदवाराचं नाव घोषित केल्यानं सुषमा अंधारे तोंडघशी पडल्या आहेत.
सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर यांच्या नावाची घोषणा केली होती. यासाठी महादेव बाबर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. पण, राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हडपसरमधून प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
पुण्यात गुरूवारी जयंत पाटील यांची पत्रकार संघात पत्रकार परिषद पार पडली. तेव्हा, 44 उमेदवारांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली. पुण्यात येऊन हडपसरच्या उमेदवाराची घोषणा न केल्यानं धाकधूक वाढली होती. 44 जागा घोषित करण्यामागे अंकगणित आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारला.
तेव्हा, ‘अंकगणिताचा प्रश्न नाही आहे. मी 45 वा उमेदवार जाहीर करतो,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मोबाइलमध्ये यादी पाहिली अन् म्हणाले, ‘तुमच्या खास मागणीवरून हडपसरमधून प्रशांत जगताप यांचं नाव घोषित करतो.’
जयंत पाटील यांनी प्रशांत जगताप यांचं नाव घोषित केल्यानं सुषमा अंधारे एकप्रकारे तोंडघशी पडल्या आहेत. कारण, अंधारे यांनी महादेव बाबर हडपसरमधून लढतील, असं दोन आठवड्यांपूर्वी घोषित केलं होतं. ‘हडपसरची जागा शिवसेनेची असून महादेव बाबर येथून लढणार आहेत,’ असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.