
दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
• जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आढावा बैठक
लातूर, दि. २७ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक प्रमोद कुमार मंडल (आयपीएस बॅच 2010) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी आज औराद शहाजनी येथील चेकपोस्टची पाहणी केली. तत्पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकारी यांची बैठक घेतली.
निवडणूक पोलीस निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व इतर निवडणूक निरीक्षक यांची भेट घेवून विधानसभा निवडणूक प्रक्रिये संदर्भात चर्चा केली. तसेच ३० ऑक्टोबर रोजी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन आगामी काळातील विधानसभा निवडणूक कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात सूचना केल्या.
निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा भागातील औराद शहाजानी येथील तपासणी नाका येथे अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच दुर्गम भागातील ठिकाणांना भेटी देऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतला.
लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक पोलीस निरीक्षक प्रमोद कुमार मंडल हे शासकीय विश्रामगृह, औसा रोड, लातूर येथे वास्तव्यास आहेत. निवडणूक प्रक्रिया तक्रारी संदर्भात मोबाईल क्रमांक ९३२२६६८६३० वर नागरिक त्यांच्याशी संपर्क करू शकतात.