
लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी केलेल्या कामाची आठवण करून देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर दक्षिणचे शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या दोन ते तीन सभा सोडून मी प्रणिती शिंदेंसाठी सोलापुरात प्रचाराला आलो होतो, त्यामुळे मी आता प्रणिती शिंदेंना सांगणार आहे की, प्रणिती, तुसुद्धा आता शिवसेना उमेदवार अमर पाटलांच्या प्रचारात उतरलं पाहिजे’ अशा शब्दांत ठाकरे यांनी आघाडी धर्माची आठवण करून देत शिंदेंचे कान टोचले.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे (Solapur South Assembly Constituency) शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारासाठी सोलापुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना आघाडी धर्माची आठवण करून शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात उतरण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मी शिवसेना आणि अमर पाटील यांच्यासाठीच सोलापुरात आलो आहे. पण, मी महाविकास आघाडीसाठीसुद्धा एकत्र आलोय. पण सोलापुरात अपक्षचं विमान आडवं जाऊ देऊ नका. आपली मतं कापायची कोणाची हिम्मत आहे का. आपली मत कापायला कोणी उभं केल असेल तर त्याला भुलू नका.
शिवसेना उमेदवारांचा प्रचार करण्याचे आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांना विशेषतः सोलापुरातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. त्याबाबत ठाकरे म्हणाले, लोकसभेला आम्ही सोलापुरातील दोन्ही खासदार पक्ष न पाहता निवडून आणले, त्याचप्रमाणे मित्रपक्षांकडून आमची तीच अपेक्षा आहे.
प्रणितीला सांगणार आहे, तूसुद्धा या प्रचारात उतरलं पाहिजे. कारण मी स्वतः प्रणितीच्या प्रचाराला आलो होतो. सुशीलकुमार शिंदे यांनी मला विनंती केली होती, त्यामुळे मी सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आलो होतो. आपल्या शिवसेना उमेदवारांच्या दोन ते तीन प्रचार सभा सोडून मी प्रणितीसाठी इथे आलो होतो, त्यामुळे प्रणिती तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलेली आहे, आता तू शिवसेना उमेदवारांसाठी मेहनत कर, असे उघड आवाहन उद्धव ठाकरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना केले आहे.
धनंजय महाडिकांचा घेतला समाचार
खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानाचाही उद्वव ठाकरे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. मुन्ना महाडिक हा मुन्ना भाई mbbs मधला मुन्ना दिसतोय, तुम्ही माझ्या माता बहिणींना नोकर समजता कां..? ही मस्ती उतरवयाला आम्ही आलोय. आम्ही महिलांना 1500 नाही तर 3000 देणार असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले..