
पुणे:विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला असताना यवतमाळच्या वणीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासल्या.या प्रकारावर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले.
स्वत: उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर काढून अधिकाऱ्यांना बोचरे सवाल केले.
महाविकास आघाडीचे वणी विधानसभेचे अधिकृत उमेदवार संजय देरकर ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत सत्ताधारी महायुतीसह केंद्र शासनावरही उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. याच सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याचा प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना बोचरे सवाल
उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून बाहेर येताच निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांना थांबवले. तुमच्या बॅगांची तपासणी करायची असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांचे ओळखपत्र मागितले. तसेच कोण कोण कुठे कुठे नोकरी करते, याची माहितीही घेतली.
निवडणूक अधिकारी : साहेब, तुमच्या बॅगा तपासायच्या आहेत
उद्धव ठाकरे : माझ्या जशा बॅगा तपासत आहात, तशा याआधी कुणाकुणाच्या बॅगा तपासल्या? तुमचे नाव काय? राहायला कुठे?
निवडणूक अधिकारी : मी अमोल घाटे, अमरावतीचा आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी माझी पोस्टिंग झाली. त्यात तुमचाच पहिला दौरा आहे. त्यामुळे तुम्हीच पहिले आहात.
उद्धव ठाकरे : मीच पहिलं गिऱ्हाईक सापडलो का? माझ्या बॅगा तपासत आहात तसे एकनाथ शिंदे-अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा तपासल्या का?
निवडणूक अधिकारी : नाही साहेब… आणखी नाही तपासल्या…
उद्धव ठाकरे : माझं युरिन पॉट देखील तपासा… बॅगा तपासायला तुम्हाला ना नाहीये… पण तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. जशा आमच्या बॅगा तपासता, तशा त्यांच्याही तपासा.
निवडणूक अधिकारी : हो साहेब, तपासतो…
उद्धव ठाकरे : मी तुमचा व्हिडीओ रिलीज करतोय… पुढच्या काही दिवसांत मला मोदी-शाह-फडणवीस-शिंदे-अजित पवार यांच्या बॅगा तपासल्याचा व्हिडीओ हवाय..
निवडणूक अधिकारी : हो साहेब (अधिकाऱ्यांनी माना डोलावल्या)
उद्धव ठाकरे : कॅमेरा दादा तुमचे नाव काय? कुठले आहात?
कॅमेरावाला नाव सांगत नव्हता त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले- अरे माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय?
कॅमेरावाले- मी एमपीचा आहे (मध्य प्रदेश)
उद्धव ठाकरे- बॅगा तपासायला देखील आता परराज्यातले माणसं आहेत.
जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी तो प्रसंग सांगितला
मी हेलिकॉप्टरने आलो, आठ दहा जण माझ्या स्वागताला उभे होते. म्हटलं बोला काय काम काढलेत? तर त्यांनी मला सांगितले की तुमची बॅग तपासायची आहे. म्हटलं तपासा, असा प्रसंग उद्धव ठाकरे यांनी सांगितला. तसेच उपस्थितांना आवाहन करताना जे लोक तुमच्या बॅगा तपासत आहेत, त्यांचेही ओळखपत्र आणि खिसे तपासा, कारण तो आपला अधिकार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जशी माझी बॅग तपासली तशी मोदी-शाहांची बॅग तपासली का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्याला विचारल्याचे त्यांनी स्वत:च सांगितले. दाढीवाले-गुलाबी जॅकेट आणि दुसरा तुमचा…. यांच्या बॅगा तपासला हव्यात की नकोत… ? मग हे लोक तपासतात का? असा प्रश्नही उपस्थितांच्या साथीने उद्धव ठाकरे यांनी विचारला.