
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत जे ‘क्लासिक’ म्हणून आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. 1975 मध्ये रिलीज झालेल्या ‘शोले’चा अशाच चित्रपटांमध्ये समावेश होतो.
रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांसारख्या सुपरस्टार्सनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट आजही लोकांना आठवतो. त्यातील प्रत्येक पात्र आजही लोकप्रिय आहे. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची जय-वीरूची भूमिका असो किंवा हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘बसंती’. या चित्रपटातील खलनायक ‘गब्बर’ आजही लोकांच्या आठवणीत आहेत. शोले या चित्रपटाशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाहीत.
शोलेमधील प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत देखील घेतली होती. या चित्रपटातील मुख्य कलाकारांना किती मानधन मिळालं होतं, याबाबत अनेकदा चर्चा होते. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण चित्रपटाचं बजेट तीन कोटी रुपये होतं. वीरूच्या भूमिकेसाठी धर्मेंद्र यांना सर्वाधिक 1,50,000 रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर संजीव कुमार यांना 1.25 लाख रुपये देण्यात आले होते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन सेंकड लीड असूनही त्यांना संजीव कुमार यांच्यापेक्षा कमी मानधन मिळालं होतं. बच्चन यांना एक लाख रुपये मिळाले होते.
( लातूरमधल्या झापुक झुपूक भाषणानंतर रितेश देखमुखचे पण व्हिडीओ व्हायरल, का होतोय ट्रोल? )
शोले या चित्रपटात हेमा मालिनी यांनी ‘बसंती’ची भूमिका साकारली होती. त्यांना या भूमिकेसाठी 75 हजार रुपये मिळाले होते. तर, राधाची भूमिका करणाऱ्या जया बच्चन यांना फक्त 35 हजार रुपये मिळाले होते. चित्रपटातील सर्व कलाकारांपैकी जया यांना सर्वांत कमी मानधन दिलं गेलं होतं. सांबाची भूमिका करणाऱ्या मॅक मोहन यांना 12 हजार रुपये, कालियाची भूमिका करणाऱ्या विजू खोटे यांना 10 हजार रुपये आणि इमाम साबची भूमिका करणाऱ्या ए.के. हंगल यांना फक्त आठ हजार रुपये मिळाले होते. अर्थात भूमिकेनुसार ते मानधन होतं.
शोले हा चित्रपट उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच त्यातील गाण्यांमुळेही गाजला होता. चित्रपटातील ‘मेहबूबा मेहबूबा’ हे आजपर्यंतचं सर्वात लोकप्रिय आयटम नंबर आहे. एनएच स्टुडिओज आणि सिप्पी फिल्म्सची निर्मिती असलेला शोले बॉक्स ऑफिसवरील सर्वात यशस्वी व्यावसायिक चित्रपटांपैकी एक आहे.