आदित्य ठाकरे यांचा आळंदीत मुख्यमंत्र्यांना चिमटापॉईंटर : खेड-आळंदीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ सभा आळंदी – शेती कशी करावी, मुख्यमंत्र्यांकडून शिका. ते थेट हेलिकॉप्टर मधून शेतात पोहचतात.
शेतकर्यांनो सांगा, तुम्ही किती वर्षांपासून शेती करताय; पण तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? नाही, मग तुम्ही कसली शेती करताय तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून शिका, ते बघा नेहमी हेलिकॉप्टरमधून थेट शेतात जातात, असा टोला शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार (ठाकरे गट) बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची आळंदी येथील फ्रुटवाली धर्मशाळा येथे जाहीर सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सचिन अहिर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, उमेदवार बाबाजी काळे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, नितीन गोरे, हिरामण सातकर, विजयसिंह शिंदे, राजुशेठ जवळेकर, अमोल पवार, सतीश राक्षे, माणिक गोरे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला राजकारणातून यांना संपवायचे आहे, असे वाटले. अगदी उद्या हे ठाकरे आडनाव लावून ही फिरतील. एकवेळ असा विचार करा, आम्ही राजकारणातून बाहेर झालो. पण एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना. बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला, नरेंद्र मोदी सांगतील का? देतील का याचे उत्तर? तिथं कोणती ही निवडणूक ही नाही. महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून, तरुणांचे रोजगार पळवून एअर बस प्रकल्प तिकडे नेल्याचा आनंद मोदींनी साजरा केला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
शिंदे, फडणवीसांना लाडका भाऊ कसं काय मानणार?
गौरी लंकेश यांच्या खुन्याला महायुतीने पक्षात घेतले. महिला पत्रकाराला तुझा बलात्कार झाला का? असा प्रश्न विचारणार्यांना तुम्ही तुमचे लाडके भाऊ समजणार का? दीड हजार रुपयांसाठी तुम्ही त्यांना मत देणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केला.
15 लाखांचे 2024 मध्ये 1500 झाले
– 2014 मध्ये हीच भाजपा 15 लाख रुपये देणार होती. भाजप खूप मोठी जादूगार आहे. आता 202 4मध्ये 15 लाखाचे किती झाले? 1500 रुपये तरी जनतेने याचा विचार करावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची बुधवारी (दि. 13) तर सोमवारी (दि. 18) उद्धव ठाकरे यांची सभा होणार. चाकण येथे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांची सभा होते तेव्हा शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याचा इतिहास आहे. एकास एक निवडणूक होण्यासाठी सर्वांनी पर्यंत केले. माऊलींच्या सेवेकर्याला एकादशीच्याच दिवशीच उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला. इंद्रायणी नदीचे दूषित पाणी वारकर्यांना प्यावे लागते तो ही लोकप्रतिनिधीना सोडवता आला नाही.
– बाबाजी काळे, उमेदवार, महाविकास आघाडी, खेड-आळंदी


