
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते राजन शिरोडकर यांचे मंगळवारी निधन झाले. राजन शिरोडकर हे गेल्या काही काळापासून आजारी होते. राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते.
कोहिनूर मिल प्रकरणात राजन शिरोडकर यांची ईडी चौकशी झाली होती. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांचे ते वडील होते.
२००६ साली जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती तेव्हा राजन शिरोडकरही त्यांच्यासोबत होते. मात्र त्यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही राजन शिरोडकर यांनी काम केले आहे. १९९५ साली युती सरकारच्या कार्यकाळात राजन शिरोडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष होते. राजन शिरोडकर यांच्या निधनाने शिवसेना आणि मनसे नेत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राजन शिरोडकर यांच्यानंतर त्यांचे पुत्र आदित्य शिरोडकर मनसेच्या विद्यार्थी सेनेमध्ये काम करत होते. मात्र त्यानंतर आदित्य शिरोडकरांनी राज ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता.
दादर येथील स्मशानभूमीत राजन शिरोडकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची दादर पश्चिम कुंभारवाडा येथे आज सायंकाळी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन-चार दिवसांत सभा होण्याची शक्यता आहे.