दक्षिण चीनमधील झुहाई शहरात कार आदळवून झालेल्या हल्ल्यामध्ये किमान 35 जणांचे प्राण गेल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दशकांमधील हा एक मोठा हिंसक हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.
खेळाच्या मैदानात सराव करत असलेल्या लोकांवर कार चालवण्यात आली. यामुळे 45 लोक जखमीही झाले असून त्यात प्रौढ व्यक्तींबरोबर लहान मुलांचाही समावेश आहे.
फॅन नावाच्या 62 वर्षीय चालकाने आपल्या घटस्फोटातील तडजोडीबद्दल समाधानी नसल्यामुळे हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याला ताब्यात घेतलं असलं तरी त्याने स्वतःलाच केलेल्या जखमांमुळे तो कोमामध्ये आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर संपूर्ण चीनमध्ये आक्रोशाचं वातावरण असून राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी यासाठी कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर कडक कारवाईचे आदेश दिले असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु शोकाकूल नागरिकांनी मैदानाबाहेर फुलं, पुष्पगुच्छ ठेवून श्रद्धांजली वाहाण्यास सुरुवात केली आहे.
फॅनने हे कृत्य जाणूनबुजून केल्याचं एका प्रत्यक्ष साक्षीदारानं चिनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
चेन नावाच्या एका गृहस्थांनी चिनी मासिक कायझिनशी बोलताना सांगितलं, ते आणि त्यांचं नेहमी चालायला येणारं मंडळ मैदानावर फेरी मारत असताना एक गाडी वेगानं लोकांना चिरडत येत असल्याचं त्यांना दिसलं.
आणखी एका व्यक्तीनं कायझिनशी बोलताना सांगितलं, पळण्याच्या ट्रॅकवरील सर्व लोकांना त्या व्यक्तीनं इजा घडवून आणली. पोलिसांनी फॅनबद्दल माहिती देताना सांगितलं, प्रारंभिक माहितीनुसार घटस्फोटानंतर सुरू असलेल्या संपत्तीवादामुळे त्यानं हे कृत्य केलं असावं. तो अद्याप कोमामध्ये असून त्याची अजून चौकशी झालेली नाही.
गेल्या काही दशकांमधला सार्वजनिक हिंसाचार घडवणारा हा एक मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे.


