महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोरोनाच्या काळात पैसे खात होते, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मालवण इथं वैभव नाईक यांच्या प्रचारानिमित्त त्यांची जाहीर सभा पार पडली.
यावेळी त्यांनी कोश्यारी यांच्यावर हा आरोप केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या काळात मी मुख्यमंत्री असताना एका कुटुंबप्रमुखा प्रमाणं जे मी सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात. लॉकडाऊन तर लॉकडाऊन पण तेव्हा भाजपवाले ते तेव्हा होते ना महामहिम कोश्यारी. म्हणजे काय कोरोनाच्या काळातही हे पैसे खात होते आणि मला पत्र लिहित होते की, मला काही माणसांनी पत्र लिहिलं होतं, ते मी तुम्हाला देतो आहे. ताबडतोब तुम्ही सर्व प्रार्थनास्थळं उघडा. तुम्हाला असा काही साक्षात्कार होतो का वैगरे त्यात लिहिलं होतं.
पण एवढी माणसं राज्यपालांना भेटलंय तरी कोण? बघावं म्हटलं तर इनमिन तीन माणसंच! आणि हे तिघेही भाजपचेच. म्हणजे तिथं देखील तुम्ही घोळ घालत होता. म्हणजे सर्वकाही उघडं करुन तुम्हाला महाराष्ट्राचा गुजरात आणि उत्तर प्रदेश करायचा होता. कोरोनानं बळी गेले तरी चालतील पण सर्वकाही उघडा, ही अशी घाणेरडी औलाद आपल्यावर राज्य करते, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी माजी राज्यपालांचा समाचार घेतला.
अमित शहा म्हणाले की मी विकासाला स्थगिती दिली होती. पण मी स्थगिती नव्हती दिली बंदी आणली होती. माझं सरकार आल्यानंतर मी परत बंदी आणणार. कारण महाराष्ट्रातून एक सुद्धा उद्योग मी गुजरातला जाऊ देणार नाही म्हणजे नाही, अमित शहा आज लिहून ठेवा तुम्ही. ज्यादिवशी महाविकास आघाडीचं सरकार येईल, तेव्हा तुम्हा लुटारुंना महाराष्ट्रातील एकही उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या आरोपांना उत्तर दिलं.
