
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शिवेसना पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. शिवसेनेतील दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहेत.
दरम्यान, भविष्यात शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण…’, सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आज बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि विचारधारा घेऊन पुढे निघालो आहे. आम्ही त्यांना पुन्हा शिवसेना भाजप युती करु म्हणून सांगितलं होतं. बाळासाहेब म्हणायचे माझ्या शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. त्यांनी त्याच काँग्रेसला जवळ घेऊन सरकार बनवले. हे सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन चालले. शिवसेना खड्ड्यात घालायला चालले, धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली म्हणून आम्ही गेलो, आमची विचारधारा बाळासाहेबांची आणि विकासाची आहे आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही २०२२ ला लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. लोकांना त्याचे रिझल्ट दिले आहेत. सध्या जर तरला काहीच अर्थ नाही, आम्ही दोन वर्षात कल्याणकारी योजना केल्या, याच आम्हाला समाधान आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवार निकालानंतर पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जातील या चर्चेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपण आता असा विचार का करायचा. शेवटी प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी असते. शिवसेना आणि भाजपाची विचारधारा गेल्या २५ वर्षापासून एकच आहे. त्यांची विचारधारा वेगळी आहे पण त्यांनी मोदींच्या विकासावर विश्वास ठेवला. राज्याचा विकास बघून ते आमच्यासोबत आले आहेत. आमची आणि त्यांची एक पॉलिटीकल अलायन्स आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.