
आदित्य ठाकरे गत पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदा वरळीतून विधानसभा लढले त्यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे यंदा अमित ठाकरे यांच्याविरोधातही उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत, असे अनेकांना वाटले होते.
जसा विचार केला तसा इतरांनी करावा, असे बंधनकारक नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. नात्यात राजकारण आणत नाही, असे सांगून माहीममध्ये उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिल्याने एकप्रकारे राज ठाकरे यांनी नाराजी देखील व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रचार संपायला अगदी काही तास राहिलेले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या रविवारी मुंबईतील बीकेसीत उद्धव ठाकरे यांनी मविआ उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी माहीमच्या जागेवर उमेदवार का उभा केला? अमित ठाकरे यांना पाठिंबा का दिला नाही, हे पहिल्यांदाच जाहीर सभेतून सांगितले.
‘ती’ एक जागा का सोडली नाही? अनेकांनी मला विचारले…
माहीमच्या जागेवर उमेदवार का उभा केला, एक जागा त्यांना (अमित ठाकरे) का सोडली नाही, असे मला अनेकांनी विचारले. त्यांना मी सांगितले, महाराष्ट्रद्रोह्यांना एकही जागा सोडणार नाही. ज्यांनी जाहीर केलं की राज्याचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. ज्यांना एकनाथ शिंदे हे उत्तम मुख्यमंत्री वाटतात, त्यांना जागा का सोडायची? मग जर का मी एक जागा सोडली असती तर माझ्या मतदारांचे मत भाजपच्या तराजूत गेले असते, असे सांगत अमित ठाकरे यांना पाठिंबा न देण्याचे कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून सांगितले.
तसेच माझं नातं माझ्या महाराष्ट्राशी आहे. करोना काळात माझे कुटुंब माझे जबाबदारी म्हणत महाराष्ट्राची जबाबदारी घेतली होती. आताही महाराष्ट्राची जबाबदारी घेऊन महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात लढायला मैदानात उतरलो आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
माहीममध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, शिंदे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढलेला असून निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीच्या रिंगणात जरी अमित ठाकरे असले तरी राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.