
विधानसभेच्या निवडणुकीसाठी बारामतीतील माळेगाव येथे शंभूसिंह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. शरद पवार यांच्यासह प्रतिभा पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे व विजय सुळे यांनी माळेगाव येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांनी शरद पवार यांना अजित पवार यांच्या सांगता सभेच्या संदर्भात एक प्रश्न विचारला. या सभेत अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांच्या पत्राचा उल्लेख करण्यात आला होता आणि यामध्ये अजित पवारांवर मोठा अन्याय झाला असे नमूद केले होते. त्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले, कसला अन्याय? पाच वेळा मुख्य उपमुख्यमंत्री पद अनेक वर्ष मंत्री, सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात आणि तरीही अन्याय झाला म्हणता? त्या तुलनेत युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना आता संधी दिली आहे आणि त्यांचा विजय निश्चित होईल.
दरम्यान शरद पवार यांनी राज्यामध्ये एकंदर चित्र पाहता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला व महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल असा दावा केला. पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की, अजित पवार यांनी राज्यामध्ये महायुतीचे सरकार येईल आणि 175 जागा मिळतील असा दावा केला आहे, त्यावर शरद पवार यांनी त्याची खिल्ली उडवताना सांगितले की, त्यांनी 175 च सांगितले का? 280 सांगायला हवे होत्या.