
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) 2014 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत बँकांनी आतापर्यंत 559 करोड लोकांनी खाती उघडली आहेत. दरम्यान, जन धन खातेधारकांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
जवळजवळ 10 कोटी जन धन खाती 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. आता त्यांना नव्यान केवायसी (Re-KYC) अपडेट करण्याची आवश्यकता आहे. बँकेच्या नियमांनुसार 10 वर्षांपेक्षा जुन्या सर्व खात्यांसाठी पुन्हा केवायसी आवश्यक आहे. 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.
सरकार 1 जुलै 2025 पासून देशभरात पंचायत स्तरावर एक विशेष केवायसी मोहीम म्हणजेच फायनान्शिअल इनक्लूजन सचुरेशन कॅम्पेन (Nationwide Financial Inclusion Saturation Campaign) राबवत आहे. खातेधारक या मोहिमेद्वारे त्यांचे पुन्हा केवायसी अपडेट करू शकतात. असं न केल्यास बँक तुमचे खाते बंद करू शकतं, ज्यामुळे सरकारी अनुदान मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
Re-KYC म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे का आहे?
नव्याने केवायसी ही एक सोपी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे बँक तपशील जसं की तुमचं नाव, पत्ता आणि फोटो अपडेट करता. यामुळे फसवणूक टाळण्यास आणि बँकिंग सेवा सुलभतेने प्रदान करण्यास मदत होते. 2014-2015 मध्ये खातं उघडलेल्या खातेधारकांनी नव्याने केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण या खात्यांसाठी केवायसी वैधता 10 वर्षं आहे. खातं सक्रिय ठेवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. एका अहवालानुसार, आतापर्यंत अंदाजे 1 लाथ ग्रामपंचायतींमध्ये शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत आणि लाखो लोकांनी त्यांचे तपशील अपडेट केले आहेत.
काय आहे प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)?
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही देशातील प्रत्येक नागरिकाला, विशेषतः गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवांशी जोडण्यासाठी एक विशेष सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, शून्य बॅलन्ससह बँक खातं उघडता येतं, ज्यामध्ये बचत खाते, पैसे पाठवण्याची सुविधा, विमा आणि पेन्शन सारख्या सेवा उपलब्ध आहेत.
हे खातं कुठे आणि कसं उघडता येतं?
कोणीही कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्राला भेट देऊन खाते उघडू शकतो. खाते उघडण्यासाठी किमान ठेवीची आवश्यकता नाही. याचा अर्थ तुम्ही शून्य बॅलन्ससह देखील खाते उघडू शकता.
जन धन योजनेचे फायदे
1) ठेवींवर व्याज मिळते
2) 1 लाख रुपयांचा अपघात विमा कव्हर उपलब्ध आहे.
3) सामान्य परिस्थितीत 30 हजारांचा जीवन विमा उपलब्ध
4) खाते उघडताना किमान शिल्लक रक्कम आवश्यक नाही
5) सर्व सरकारी योजनांमधील निधी थेट खात्यात हस्तांतरित केला जातो
6) देशभरात पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध
7) खाते 6 महिने चालू ठेवल्यास 5 हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे.
8) पेन्शन आणि विमा यासारखे फायदे देखील उपलब्ध