
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळ कोकणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महायुती तसेच महाआघाडीमध्ये इनकमिंग तसेच आऊटगोईंग सुरू आहे. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बडतर्फ केलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी हे देखील भाजप पक्षात जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार, मनसेनं वैभव खेडेकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती. या निर्णयामुळे खेडेकर नाराज झाले होते. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२२ तारखेला वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याची माहिती आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे आणि खासदार राणेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
याचवेळी माजी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णीही भाजपसोबत जाणार असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अद्वैत कुलकर्णी काही काळ पक्षापासून दुरावले होते. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा राजकारणात सक्रीय होणार आहेत. कुलकर्णी लवकरच भाजप पक्षात जाणार असल्याची माहिती आहे.