
मोदींच्या सर्वात कार्यक्षम मंत्र्यांना करणार ‘एक्सपोज’; नाव केलं जाहीर…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून रान उठविण्यात आले होते. त्यापैकी काहींना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक कार्यक्षम आणि प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या मंत्र्यांना एक्सपोज करणार असल्याचे दमानियांनी जाहीर करत खळबळ उडवून दिली आहे.
दमानिया यांनी मंगळवारी सोशल मीडियात पोस्ट करून या मंत्र्यांचे नाव जाहीर केले आहे. हे मंत्री म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आहे. उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्याविरूध्द पोलखोल करायला सुरूवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार असल्याचे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय धमाका करणार?
दमानिया यांच्या या पोस्टमुळे आता त्या नेमका कोणता धमाका करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मंगळवारी सकाळीच त्यांनी गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांच्या फायद्याबाबत सोशल मीडियातच पोस्ट केली आहे. सियान अग्रो इंडस्ट्रीज अन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.
सोमवारीही दमानियांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, गडकरी असा दावा करता की, त्यांच्याकडे खूप असल्याने पैशांची गरज नाही. दर महिन्याला 200 कोटींपेक्षा आपल्या मेंदूचे मोल अधिक आहे. हे कमी लेखल्यासारखे आहे. गडकरींची मुलं दररोज 144 कोटींनी श्रीमंत होत आहेत.
सियान अग्रो ही त्यांची कंपनी असून जून 2025 अखेर 1 कोटी 89 लाख 38 हजार 121 शेअर्स आहेत. गडकरी यांचे पुत्र निखील आणि सारंग यांची दिवसाला 143.92 कोटी रुपयांची कमाई होत असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. त्यामुळे आता दमानिया यांच्याकडून या कंपन्यांबाबत उद्या अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.