
‘अंदर चलो…आगे बढो…जगह हैं…’
सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्यांमधून हेच आवाज येतात. अगदी 5-5 मिनिटाला जरी स्थानकावर गाडी आली तरी हीच परिस्थिती असते
एसी लोकलची स्थिती काही वेगळी नाहीये. बऱ्याचदा गर्दीमुळे या गाड्यांचे दरवाजेही सहजासहजी लागत नाहीत. परंतु पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
पश्चिम रेल्वेवरील एसी गाड्यांच्या ताफ्यात आता लवकरच नवीकोरी गाडी दाखल होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एसी गाड्यांची संख्या होईल 8.
नॉन एसी गाड्यांच्या तुलनेत एसी लोकलचं तिकीट अव्वाच्या सव्वा आहे. त्यामुळे कोण करणार एसी लोकलने प्रवास, असं म्हटलं जात होतं खरं, परंतु आता मात्र एसी लोकलमध्ये खचाखच गर्दी असते. या गाड्यांना प्रवाशांनी विशेष पसंती दिलीये. आकडे पाहायचे झाल्यास, सध्या पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधून दररोज जवळपास 1.25 लाख लोक प्रवास करतात. आता नव्या गाडीमुळे एसी लोकलची गर्दी विभाजित होण्यास मदत मिळू शकेल, अशी आशा आहे.
पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नवी गाडी चेन्नईहून रवाना झालीये, लवकरच ती मुंबईत दाखल होईल. प्रवाशांसाठी ही गाडी कधीपासून धावेल याची काही ठराविक तारीख देण्यात आलेली नाही. दरम्यान, मध्य रेल्वेलाही लवकरच एक नॉन एसी लोकल मिळणार आहे. ही गाडी हार्बर मार्गावरून धावेल असं कळतंय.