
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला. महायुतीला २३० तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले.
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीनंतर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढण्याची चर्चा आहे. याचदरम्यान, शिवसेनेची ताकद २८८ मतदारसंघात निर्माण करायला हवी, असं विधान ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केलं. अंबादास दानवे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंबादास दानवे म्हणाले,’आपल्या पक्षाची ताकद राज्यातील २८८ विधानसभा मतदासंघात निर्णाण करायला हवी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील, हे माहिती नाही. आम्ही आघाडीमधून बाहेर पडणार नाही. याच आघाडीमधून लोकसभेला ३१ जागा जिंकलो होतो. वेगळ्या भूमिका होणार नाही’.
‘काँग्रेसचे लोक कुठलं खातं मिळणार, यावर चर्चा करत होते. मुख्यमंत्रिपदासाठी सुद्ध १० लोक चर्चा करत होते. लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये जास्त आत्मविश्वास आला होता. हे माझं वैयक्तिक मत मांडत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले .
मनसेच्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना दानवे म्हणाले, ‘मनसे कोणाच्या बाजूने होती हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढत होते. दुसऱ्या बाजूला म्हणत होते, त्यांना मुख्यमंत्री करा. त्यांची भूमिका नेमकी काय होती? त्यांचा वैचारिक गोंधळ होता. मनसेबद्दल आमच्या पक्षात शून्य टक्के चर्चा आहे’.
मतदान केंद्रावर भाष्य करताना दानवे म्हणाले, ‘गावागावात काय झालं ते तुम्हाला काय सांगू? लोकं वाट बघत होते की, काहीतरी मिळेल’ ईव्हीएमवर भाष्य करताना बॅलेच पेपरवर निवडणुका घेण्यास का घाबरत आहेत. जनतेचे हे मत असेल तर का, विचारात घेतलं जात नाही’ तसेच, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन पुन्हा आम्ही उभारी घेऊ, असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.